गर्दी नसल्याने गणेशोत्सवातील हातसफाई कमी

पुणे(प्रतिनिधी)  : गणेशोत्सवावर यंदा करोनाचे सावट आहे. शहरातील सर्व मंडळांनी उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उत्सवी गर्दीत भाविकांकडील दागिने, मोबाइल संच लांबविण्याचे शेकडो गुन्हे घडतात. यंदाच्या वर्षी मात्र गर्दी नसल्याने चोऱ्या माऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. 

दरवर्षी परजिल्हयातून काही पाकिटमार आणि मोबाईल चोरांच्या टोळ्या उत्सवात शहरात दाखल झालेल्या असतात. दर्शनाची गर्दी आणि विसर्जन मिरवणूकीत हातचलाखी दाखवून दरवर्षी शेकडो मोबाईल, पार्किट आणि चेन चोरीचे गुन्हे त्यांच्याकडून केले जातात. 

शहरातील बेलबाग चौक, शिवाजी रस्ता, मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार परिसरात गणेशोत्सवात गर्दी असते. उत्सवाच्या कालावधीत मध्यभागातील सर्वच रस्त्यावर गर्दी असते. देखावे पाहण्यासाठी सायंकाळनंतर गर्दी होत असली तरी उत्सवाच्या काळात शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौक (बुधवार चौक) ते बेलबाग चौकात अहोरात्र गर्दी असते. या भागात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज्य तसेच परराज्यातून भाविक गर्दी करतात.

उत्सवाच्या कालावधीत भाविकांकडील मोबाइल संच तसेच महिलांचे दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. यामुळे पोलिसांचा दहाही दिवस खडा पहारा असतो. शहराच्या मध्यवर्ती भागात साध्या वेशातील पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेचे पथक, छेडछाडविरोधी पथक आणि इतर पथके तैनात केलेली असतात. नागरिकांना ध्वनिक्षेपकावरुन आपापल्या किंमती ऐवजाची काळजी घेण्याचे आवाहनही केले जात असते. यंदा गर्दीच नसल्याने अशी पथके नेमण्यात आली नाहीत. मात्र पोलिसांचा बंदोबस्त आणि रस्त्यावरील वावर दरवर्षीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.