चांगल्या विकासकामांमुळे राज्यात महायुतीची सत्ता येईल : रहाटकर

‘नारीशक्ती विथ देवेंद्रभाऊ’ हा कार्यक्रम घेऊन मी राज्यभर दौरा करत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने राज्यात महायुतीची सत्ता येईल, असा विश्‍वास महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सातारा येथे व्यक्त केला.

रहाटकर म्हणाल्या, “केंद्र व राज्य शासनाने महिलांसाठी नानाविध योजना राबविल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजना ताकदीने राबविली. सिंचन योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. रस्ते, मेट्रो, समृद्धी महामार्ग यांसह राज्य व देशपातळीवरील रस्त्यांची कामे हाती घेतली.

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्या राज्यात महिला उद्योगाचे धोरण राबविले गेले. राज्यात आज पाच लाख बचत गट कार्यरत आहेत. महिला उद्योगिनी योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली जात आहे त्यामुळे आज सर्व महिला भाजपबरोबर आहेत. “माझी कन्या भाग्यश्री’ योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजाच्या तळागाळात पोहोचवली.

विद्यमान सरकारने महिलांसाठी अत्यंत चांगले काम केले तरी, आजही त्या काही अपेक्षा व्यक्त करत आहेत.’ महिलांसाठी काही कठोर निर्णय घेतले जात आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास त्याला फाशीची शिक्षा होणार आहे, याबाबत केंद्र सरकार अत्यंत सकारात्मक भूमिका घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या विकासकामांमुळे महायुती सरकार पुन्हा येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.