पुणे – गणेशोत्सवामुळे पवित्र फळ असलेल्या नारळाला मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील भुसार विभागात पाच दिवसांपासून नव्या नारळाची आवक सुरू झाली आहे. तमिळनाडूतील वाणी अंबाडी भागातून नारळ बाजारात दाखल होत असून त्यास मागणीही चांगली आहे. घाऊक बाजारात नारळाच्या शेकड्यास 1 हजार 600 ते 1 हजार 700 रुपये भाव मिळत असल्याची माहिती नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.
पाच दिवसांपासून मार्केटयार्डात दररोज दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास दोन ते अडीच लाख नारळ दाखल होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा नव्या नारळाच्या आवकेत निम्म्याने घट झाली आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नारळाच्या शेकड्यास 1,400 ते 1,500 रुपये भाव होता. त्यामध्ये वाढ होऊन भाव 1,600 ते 1,700 रुपयांवर पोहोचला आहे.
नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी वापरण्यात येतो. हा नारळ आकाराने छोटा व मध्यम असतो. उत्सवांच्या निमित्ताने पूजेपासून ते सत्कारापर्यंत नव्या नारळाला नेहमी मागणी राहते. दरवर्षीप्रमाणे, घरगुती ग्राहकांकडून नारळाला मागणी कायम आहे. मात्र, सार्वजनिक उत्सवावर मर्यादा आल्याने तोरण तसेच पूजेसाठी लागणाऱ्या नारळाच्या मागणीत घट झाली आहे.