पुणे – गणेशोत्सव आणि मोदक हे समीकरणच आहे. तसेच, या उत्सवात भक्त मोठ्या प्रमाणात नारळाचे तोरण गणरायाला अर्पण करत असतात तसेच पूजेसाठी नारळाला मागणी वाढते. त्यातच हॉटेल चालक, केटरिंगवाले आणि दक्षिण भारतातील खाद्यपादार्थ तयार करणारेही नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या सर्व कारणांमुळे मागील आठवडाभरापासून नारळाला मोठी मागणी वाढली आहे, ही मागणी आता दिवाळीपर्यंत कायम असणार आहे.
पुण्यात सार्वजनिक गणपती मंडळाची संख्या सुमारे पाच हजार इतकी आहे. तसेच, बहुतांश घरात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे उत्सव काळात नारळाला मोठी मागणी असते. संपूर्ण उत्सव काळात २० ते २५ लाखापेक्षा अधिक नारळाची खरेदी होते. गणरायाला वाहण्यासाठी तोरण, पूजेसाठी नारळाची खरेदी केली जाते.
उत्सव काळात भाविक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असतात. त्यामुळे हॉटेलच्या ग्राहकांतही वाढ होते. त्यामुळे हॉटेल चालकांकडूनही नारळाला मागणी वाढते. गणेशोत्सवात मोदकांची विक्री करणार्यांनी मागणी आठ दिवसांपासूनच नारळाची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे नारळाला चांगली मागणी असल्याचे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगतले.
तामिळनाडूमध्ये नारळाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच खोबरेल तेल आणि गोटा खोबर्याला मागणी असल्याने त्यासाठीही नारळाचा वापर होत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक बाजारात शेकड्याच्या दरात २०० रूपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात नारळाच्या दरात ३ ते ५ रूपयांनी वाढ झाली आहे.
मार्केट यार्डातील बाजारात कर्नाटक येथून साफसोल, तामिळनाडू येथून नवा नारळ आणि आंध्र प्रदेशातून पालकोल नारळाची आवक होत आहे. नवा नारळ तोरणासाठी, मोदक आणि हॉटेलसाठी साफसोल, किराणा दुकानात तसेच पूजेसाठी पालकोळ नारळाचा वापर केला जातो. असेही दीपक बोरा यांनी सांगितले.
“सण आणि उत्सवाला सुरूवात झाली आहे. परिणामी, नारळाला मागणी वाढली आहे. ही मागणी दिवाळीपर्यंत असणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दरात थोडी वाढ झाली आहे.” – दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केटयार्ड
घाऊक बाजारातील नारळाचे (शेकडा) दर
साफसोल २१०० ते २९००
नवा नारळ १५०० ते १८००
पालकोल १७०० ते १८००