दुष्काळामुळे गळीत हंगाम घटण्याची भीती

– प्रमोल कुसेकर

मांडवगण फराटा – भीमा व घोडनदीचे पात्र हे शिरूर तालुक्‍याला लाभलेले खूप मोठे वरदान आहे. बारमाही वाहणाऱ्या या नद्यांमुळेच येथे उसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन कमी करून कांदा व अन्य शेतमाल घेण्यास सुरवात केली आहे.

शिरूरचा पूर्व भाग हा उसाचे आगार समजला जातो. कारण या परिसरात श्रीगोंदा तालुक्‍यातील साईकृपा व श्रीगोंदा सहकारी कारखाना, दौंड तालुक्‍यातील दौंड शुगर, भीमा पाटस, अनुराज शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा तसेच शिरूर तालुक्‍यातील घोडगंगा, व्यंकटेश कृपा या कारखान्यातील अंतर 25 ते 30 किलोमीटरच्या आत आहेत. सतत कमी पडणारा पाऊस व अन्य नगदी पिकांचे वाढलेले प्रमाण यामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्याचा थेट परिणाम साखर कारखान्याच्या धुरांड्यावरच होणार आहे. त्यातच यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांनी नदीचे पात्र कोरडे पडल्याने सहा महिन्यांपासून बारा महिन्यापर्यंतचा ऊस पाणी नसल्याकारणाने चारा छावण्या व रसवंती यांना देऊन टाकला आहे. उसाअभावी कारखाने यंदा पूर्ण क्षमतेने चालणार नाहीत, पण जे कारखाने सुरू होतील तेसुद्धा जास्त दिवस सुरू राहणार नाहीत या कारणाने जिल्ह्यातील कारखानदारी अडचणीत सापडणार आहे.

दौंड तालुक्‍यातील केडगाव, नानगाव, यवत या परिसरात ऊस उत्पादकांची गुऱ्हाळे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे गुळ उत्पादक हा बारामती, शिरूर, दौंड, श्रीगोंदा, नगर जिल्ह्यातून गुळ बनविण्यासाठी ऊस लागत असल्यामुळे या भागातील ऊस उत्पादन घटत चाललेले आहे. पाण्याअभावी ऊस जळून चालल्याने शेतकऱ्यांनी तो ऊस गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळासाठी तसेच रसवंतीगृहे व चारा छावण्यांसाठी दिला आहे. त्यामुळे उसाचे कोठार समजल्या जाणाऱ्या तालुक्‍यांमध्येच यंदा कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळणार नसल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिरूरच्या पूर्व परिसरातील मांडवगण फराटा, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, तांदळी या परिसरातील निम्म्यापेक्षा जास्त ऊस तुटून गेला आहे. घोडनदीचे पात्र कोरडे पडल्याने इनामगाव, पिंपळसुट्टी, शिरसगाव काटा परिसरातील 25 टक्केही ऊस शिल्लक राहीला नाही. यंदा साखर कारखाने 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस चालणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. साखर कारखान्याबरोबर गुऱ्हाळ उत्पादक व त्याच्याकडील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे साखर कारखान्याबरोबरच शेतात काम करणारे मजूर, खते व बियाणे विक्री करणारे उत्पादक, उस तोडणारे कामगार या सर्वांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. ऊसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे या वर्षी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी आपले ऊस लागवडीचे धोरण लवकरच जाहीर केले आहे.

भाजप सरकारने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे भीमा व घोड या दोन्ही नद्या लवकरच आटल्या. शेतकऱ्यांनी ऊस जळेल या भीतीने स्वतःचा तोटा करीत कमी भावात ऊस विकला याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार आहे. या भागात ऊस कमी राहिल्याने कारखाने किती दिवस चालतील हे आताच सांगता येणार नाही.
-अशोक पवार, अध्यक्ष, घोडगंगा साखर कारखाना.


यावर्षी दुष्काळाच्या झळा मोठ्या स्वरुपात बसत असून, गेल्या वर्षी 182 दिवसांत आठ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. यावर्षी शंभर दिवस कारखाना चालेल याबाबत शंका वाटते. साधारण साडेचार लाख मेट्रीक टन गाळप होईल. कारखाना लवकरच बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
-दिलीप कुरकुटे, शेतकी अधिकारी, भीमाशंकर साखर कारखाना.


गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भीमा नदी लवकर आटल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊसाचे दोन रुपये होतील या हेतूने गुऱ्हाळ व रसवंतीला दिला आहे. पर्यायाने ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे.
-किरण विलास कळसकर, शेतकरी, तांदळी.

कारखान्यांकडे नोंद आहे, तरीही…
यंदा दौंडमधील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे सुमारे 5,500 हेक्‍टर परिसरात ऊस लागवडीची नोंद आहे. पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा 7,100 हेक्‍टर, अनुराग शुगर 3,400 हेक्‍टर, दौंड शुगर 5,500 हेक्‍टर तर शिरूर तालुक्‍यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याकडे 6255 हेक्‍टर, व्यंकटेश शुगर 6400 हेक्‍टर ऊस लागवड क्षेत्राची नोंद झाली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील भीमाशंकर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 7,000 हेक्‍टर तर पराग शुगर्सकडे 2,500 हजार हेक्‍टर ऊस लागवड नोंद झाली आहे. याप्रमाणे दौंड व शिरूर या तालुक्‍यातील खासगी व सहकारी कारखान्याकडे ऊस लागवडीच्या क्षेत्राची नोंद झालेली आहे; परंतु यंदा दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नोंद झालेल्या कारखान्यांकडे इतका नोंदीएवढा उस मिळण्याची खात्री राहिलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.