गिरीश बापटांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
वादाला प्रेमाचा मुलामा
लांडगे आणि जगतापांमध्ये वाद असल्याचे सांगताना बापट यांनी त्याला प्रेमाचा मुलामा दिला असला तरी महापालिकेतील सत्तासंघर्ष विकोपाला जाण्याचीच शक्यता आहे. तर आपले वर्चस्व रहावे, यासाठी भविष्यात पाडापाडीचे राजकारण झाले तर आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा राजकीय वर्तुळात उमटली होती.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यापासून भोसरीचे आमदार महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षाची जाहीर वाच्यता नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी केल्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात या वादाची चर्चा जोर धरू लागली आहे. पदवाटपावरून दोघांत वाद असल्याचे बोलले जात होते मात्र बापटांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केल्यामुळे याबाबत आश्चर्यही व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होते. मात्र मोदी लाटेमध्ये तिनही आमदार राष्ट्रवादी विरोधी निवडून आल्यानंतर महापालिकेतही सत्ता परिवर्तन झाले. भाजपाचे सहयोगी सदस्य असलेले महेश लांडगे आणि भाजपाच्याच तिकीटावर आमदार झालेले लक्ष्मण जगताप यांच्या महापालिकेतील सत्ता वाटपावरून कलगीतुरा रंगल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या होत्या. मात्र एकमेकांना शह-काटशह देताना दोघांनी अथवा पक्षातील कोणीच या संघर्षाची जाहीर वाच्यता केली नव्हती.
महापौरपद असो वा स्थायीचे अध्यक्षपद, प्रभाग समित्यांची निवड असो अथवा विषय समित्यांची निवड आपले समर्थक या पदांवर राहिले पाहिजे आणि आपल्या आदेशाने महापालिकेचा कारभार चालला पाहिजे यासाठी गेली अडीच वर्षे दोघांमध्ये सुप्त संघर्ष अनेकवेळा झाला होता. मार्चमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरूनही दोघांमध्ये वाद विकोपाला गेला होता. मात्र दोघांनीही याची वाच्यता केली नव्हती.
पक्षीय पातळीवर हे वाद मिटविण्यात वरिष्ठांना आजपर्यंत यश आले होते. ठेकेदार आणि कामांच्या वाटपावरूनही अनेकदा दोघांमध्ये अंतर्गत खटके उडाले होते. या वादाची जाहीर वाच्यता गिरीश बापट यांनी करून पक्षांतर्गत सर्व काही अलबेल नसल्याचेच संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाद चव्हाट्यावर मांडण्याचा उद्योग बापट यांनी केल्यामुळे पक्षीय पातळीवर तसेच राजकीय पातळीवर याचे आज सूर उमटले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आल्यामुळे पक्षात नवा वाद उमटण्याची चिन्हे वर्तविण्यात येत आहेत.