सुशोभिकरणामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवासी रस्त्यावर

उंब्रज येथे बसस्थानकाच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय 
दिलीपराज चव्हाण

उंब्रज – येथील बसस्थानक हे नागरिकांच्या सोयीसाठी का त्रासासाठी हा नेहमीचाच प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला जात आहे. सद्या बसस्थानकाचे काम सुरू असून यात प्रवाशांना अधिकच्या काय सुविधा मिळणार, की ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच कारभार असणार. हे नियोजित सुशोभिकरण कसे होणार, नेमके काय बदल होणार असे एक ना अनेक प्रश्न प्रवाशांसमोर आ वासून उभे आहेत. प्रथमदर्शनी तर जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत एवढेच दिसून येत आहे.

उंब्रज येथील बसस्थानकामधील समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने मार्च 2018 मध्ये उंब्रज बसस्थानक सुशोभीकरण व दुरुस्तीची जवळपास 12 लाख रुपयांची निविदा जाहीर केली होती. एक वर्षाच्या विलंबाने अनेक अडथळे पार करीत मार्च 2019 अखेरच्या अगोदर काम दिसावे, यासाठी दुरुस्तीचे काम घाईघाईने सुरु झाले आहे. यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. नुतनीकरणात शेडचे जुने लोखंडी अँगल तेच फक्त ठिकाण बदलले आहे. त्यामुळे होणाऱ्या कामाबद्दल नागरिकांच्यामधून उलटसुलट चर्चा चालू आहे. याबाबत माहिती घेतली असता फक्त बसस्थानक शेडची दुरुस्ती होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. यात स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वाहनतळ, डांबरीकरण या सुविधांचा या निविदेमध्ये कोणताही उल्लेख नसल्याचे बोलले जात आहे.

मूलभूत सोयी मिळणार नसतील तर बसस्थानकाचे नूतनीकरण कशासाठी व कोणासाठी असा सवाल उंब्रजकरांसह येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी करु लागले आहेत. उंब्रज बसस्थानकाला गैरसोयीचे लागलेले ग्रहण संपून प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. यात प्रशस्त बैठक व्यवस्था, फलाट, स्वागतकक्ष, सुसज्ज उपहारगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे मुबलक व स्वच्छ पाणी, वाहनतळ या मुलभूत सुविधा उपलब्ध होणार कि नाही याबाबत प्रवाशांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या उंब्रज येथील बसस्थानक हे परिवहन महामंडळाला नेहमीच नफा मिळवून देत आहे. उंब्रज बरोबरच परिसरातील शेकडो गावे, वाड्यावस्त्यांवरील नागरिकांच्या दृष्टीने हे बसस्थानक महत्वाचे आहे. सातारा, कराड, तारळे, मसूर, चाफळ, चोरे ही महत्वाची गावे तसेच कोकणचे प्रवेशद्वार म्हणूनही उंब्रजची ओळख आहे. नियमित हजारो प्रवाशी, शाळा कॉलेजचे शेकडो विद्यार्थी उंब्रज बसस्थानकातून एसटी बसचा प्रवास करतात.

प्रवाशी वर्गाला लागणाऱ्या मुलभूत सोयीसुविधा बरोबरच इतर समस्यावर संबधीत अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे.
लांब पल्याच्या बसेस बसस्थानकात येत नाहीत. त्या महामार्गावरच थांबत असल्याने ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण नसतानाही प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. महिला वर्ग व आबालवृद्धांना एसटीची वाट पाहत उभे राहवे लागते. आता तर ऐन उन्हाळ्यात बसस्थानक दुरुस्ती सुरु असल्याने डोक्‍यावर छप्पर नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे, याकडे संबंधित कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.