10 लाख लोकसंख्येसाठी 714 टॅंकर ; पाथर्डी तालुक्यत सर्वाधिक टॅंकर
नगर: जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच असून, पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील 472 गावांना सध्या 714 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टॅंकरच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्राणात वाढ होत आहे.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची संख्या अत्यंत कमी राहिली. मागील दोन वर्षांत जिल्हाभरात राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान आणि त्यानंतर गतवर्षीच्या हंगामात झालेला पुरेसा पाऊस, यामुळे दुष्काळी गावांची संख्या घटली होती. परंतु यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल झाले असून, आज अखेर 714 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
अपुऱ्या पावसुळे उद्भवलेली पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आज अखेर 472 गावे व 2 हजार 639 वाड्या-वस्त्यांसाठी 714 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून, जिल्ह्यातील 10 लाख 74 हजार 278 नागरिकांची तहान भागवली जात आहे.
सध्या सर्वाधिक 139 टॅंकर पाथर्डी तालुक्यात सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर परनेर तालुक्यासाठी 120, तर कर्जत तालुक्यात 93 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर राहुरी तालुक्यात सर्वाधिक कमी टॅंकर सुरु असून, तालुक्यात 1 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात जलयुक्त शिवार अभियानाचे मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. परंतु यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली. परिणामी या मतदारसंघात आजमितीस प्रशासनाकडून 143 टॅंकर सुरू करून नागरिकांची तहान भागविली जात आहे.
तालुका, गावे, वाड्यावस्त्या, लोकसंख्या, टॅंकर
पाथर्डी – 106 – 588- 224176- 139.
संगनेर- 35- 216-94445-46.
अकोले-1-12-4512-3.
कोपरगाव-4-42-11276-3.
नेवासा- 29-54-65673-33.
राहाता- 1- 26 – 8859- 4.
नगर – 36- 232- 75656- 57.
पारनेर- 72- 480- 170510- 120.
शेवगाव-40-171- 65843- 57.
कर्जत- 70- 448- 141890-93
जामखेड – 41- 61- 76851- 50.
श्रीगोंदा- 32- 266- 86025 -46.
राहुरी-2 – 0- 562-1.
गाव टॅंकरमुक्त करण्याचा अनेक गावकऱ्यांचा निर्धार
दुष्काळाशी दोन हात करून गावा-गावांत जलक्रांती घडविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेत आहेत. 8 मार्चपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अनेक गावे उतरली आहेत. ही स्पर्धा 22 मे पर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत श्रमदान करून नदी, नाले, शेततलाव, बांधबंदिस्ती करण्यात येणार आहे. दुष्काळाशी दोन हात करत असून गाव टॅंकरमुक्त करण्याचा निर्धार अनेक गावांनी केला आहे.