एच.ए. कामगारांना नववर्षाची भेट
पिंपरी – संत तुकारामनगर येथील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्स कंपनीतील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांची थकीत देणी 31 जानेवारीपर्यंत दिली जाणार आहेत. त्याबाबतचे लेखी आश्वासन कंपनीकडून कामगारांना देण्यात आले आहे.
एच.ए. कंपनीतून 31 डिसेंबरला 250 कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. त्यांना स्वेच्छानिवृत्तीची रक्कम, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी, थकीत वेतन आदींची रक्कम देण्यात आली आहे. मात्र, 250 पैकी 105 कामगारांना स्वेच्छानिवृत्तीची रक्कम दीडपटऐवजी एकपटच मिळाली आहे. संबंधितांना ही उर्वरित रक्कम देणे प्रलंबित आहे.
त्याशिवाय, ग्रॅच्युएटी, बोनस, एलटीसी आणि एच.ए. सोसायटीचे पैसे देणे बाकी आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ यांची गुरुवारी (दि. 23) भेट घेतली. एच.ए.मजदूर संघाचे माजी खजिनदार शंकर बारणे, संभाजी मुळीक, श्यामकांत पत्की, प्रवीण मोरे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
बारणे म्हणाले, “एच.ए. कंपनी व्यवस्थापनाने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांना थकीत देणी 31 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेच्या आत देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. व्यवस्थापनाने दिलेली स्वेच्छानिवृत्तीची रक्कम, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधीची रक्कम याबाबतचे स्टेटमेंटही कामगारांना द्यावे, अशी मागणी केलेली आहे. तसेच, 105 कामगारांना स्वेच्छानिवृत्तीची अपुरी रक्कम मिळाली आहे. त्यांना उर्वरित रक्कम मिळावी, अशी मागणी केलेली आहे. तसेच, ग्रॅच्युएटी, एच.ए. सोसायटीचे पैसे, बोनस आणि अन्य देणी देखील दिली जाणार आहेत.