दुबेचा वॉन्टेड साथीदार मुंबई एटीएसच्या हाती

मुंबई – कुख्यात गुन्हेगार विकास दुबे काल पोलिसांच्या तावडीतून निसटण्याच्या प्रयत्नात असताना झालेल्या चकमकीत मारला गेला. दुबे आणि त्याच्या साथीदारांनी कानपुरातील बोकरू गावामध्ये कारवाईसाठी आलेल्या पोलिसांवर बेछूट गोळीबार करत ८ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची हत्या केली होती. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी दुबे व त्याच्या साथीदारांचा नायनाट करण्याची मोहीम हाती घेतल्याचं चित्र असून दुबेसह त्याच्या इतर काही साथीदारांचा पोलिसांकडून कथित एन्काऊंटर करण्यात आलाय.

दरम्यान, दुबेच्या एका साथीदाराला आज मुंबईतून अटक करण्यात आली आहे. अरविंद तिवारी असं या व्यक्तीच नाव असून पोलीस हत्याकांडाशी त्याचा संबंध असल्याचं सांगितलं जातंय. याबाबतची कारवाई जुहू आतंकवादी विरोधी पथकाकडून करण्यात आली आहे. अरविंद याच्यासोबतच त्याचा चालक सुशीलकुमार तिवारी याला देखील अटक करण्यात आली आहे.

बोकरू पोलीस हत्याकांडातील एक वॉन्टेड गुन्हेगार मुंबईतील ठाणे परिसरात लपण्यासाठी जागेच्या शोधात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ शोध सुरु करत अरविंद तिवारी व त्याचा चालक सुशीलकुमार तिवारी यांना ताब्यात घेतले. तिवारी याची चौकशी केली असता त्याने आपण दुबेसोबत अनेक गुन्ह्यांमध्ये साथीदार असल्याचे कबूल केले.

२००१ साली राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्याकांडामध्ये देखील आपण दुबेसोबत सामील होतो अशी महत्वपूर्ण कबुलीही तिवारी याने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.