कॉसमॉस बॅंक सायबर हल्ल्याचे दुबई कनेक्शन; एकाला अटक, प्रत्यार्पणासाठी प्रयत्न

पुणे – येथील कॉसमॉस बॅंकेवर सायबर हल्ला करून तब्बल 94 कोटी रुपये लांबवल्याप्रकरणात एकास संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोलिसांनी अटक केली आहे. “टॉप थ्री’ आरोपींपैकी तो एक आहे. दरम्यान, त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून “यूएई’ पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली.

 

 

सुमेर शेख (वय 28, रा.मुंबई, सध्या दुबई) असे त्याचे नाव आहे. सायबर गुन्हेगारांनी दि.11 व 13 ऑगस्ट 2017 दरम्यान कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर सायबर हल्ला चढवून टोळ्यांकडे दिलेल्या बनावट एटीएम कार्डचा वापर करत तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये हडपले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक करत 1,750 पानांचे दोषारोपपत्रही दाखल केले आहे.

 

 

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरुन कॉसमॉस बॅंकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्ट्रॉनिक माहिती चोरली. याचद्वारे बनावट एटीएम कार्ड बनवले. दरम्यान, बनावट कार्ड वापरात आणण्यासाठी हल्ल्याच्या एक दिवस आधी बॅंकेचे एटीएम स्वीच सर्व्हर हॅक करण्यात आला होता. सायबर हल्ल्यानंतर तो पैसा घेण्यासाठी गुन्हेगारांनी देश-परदेशांतील टोळ्यांद्वारे पैसे काढून घेतले. तर हॉंगकॉंगच्या हेनसेंग बॅंकेमध्ये आरोपींनी 11 ते 12 कोटी रुपये पाठवले होते. त्यापैकी सहा कोटी रुपये परत मिळवण्यात पुणे पोलिसांना यश आले.

 

 

दरम्यान, या सायबर हल्ल्यात सुमेर शेखची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानेच या हल्ल्याचे नियोजन केल्याची दाट शक्यता आहे. डार्कवेबवरून बॅंक ग्राहकांचा डेटा विकणे किंवा विकत घेणे, बनावट डेबिट कार्ड तयार करणे आणि हल्ल्यानंतर पैसे घेणे अशी त्याची भूमिका असण्याची शक्यता आहे. इंटरपोलच्या माध्यमातून शेखबाबत रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे 28 देशांचे पोलीसही सतर्क झाले होते. त्यादृष्टीने “यूएई’ पोलीस तपास करत असताना शेख त्यांच्या जाळ्यात अडकला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.