नियोजनाअभावी दुहेरी वाहतुकीची अडचण

ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे कोंडलय साताऱ्याचे नाक : अडीच महिन्यांपासून मंदावली कामाची गती
सातारा – सातारा शहराचे नाक समजल्या जाणाऱ्या पोवईनाक्‍याचा श्‍वास गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे कोंडला आहे. मात्र नाका आता हळूहळू मोकळा श्‍वास घेत असून नियोजनाअभावी दुहेरी वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अत्यंत संथगतीने हे काम सुरु आहे. शहर वाहतूक शाखा ते शिवाजी सर्कलपर्यंतचे राजपथावरील काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पोवई नाका ते सायली हॉटेल या दरम्यान ग्रेड सेपरेटरवर स्लॅब टाकण्यात आला असून प्रत्येकी तीन फुटावर वायुवीजनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. भुयारी मार्गात पाण्याचा निचरा करणारी गटारे बनवण्यात आली असून त्यायोगे पाणी बाहेर काढले जाणार आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता असल्याने लवकरच राजपथ मोकळा श्‍वास घेण्याची चिन्हे दिसत आहेत. पोवईनाक्‍यावरील शिवाजी सर्कलला आठ रस्ते येवून मिळतात. या ठिकाणी सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सातारकरांपुढील मोठी समस्या होती.

किमान काही प्रमाणात तरी वाहतूक कोंडीतून साताकरांची सुटका व्हावी या हेतुने या ठिकाणी भुयारी मार्ग तथा ग्रेडसेपरेटरचे सुमारे 52 कोटी रुपये खर्चाचे काम फेब्रुवारी 2018 मध्ये सुरु करण्यात आले. ग्रेड सेपरेटरच्या कामाचा कालावधी निविदेमध्ये दोन वर्षांचा दिला आहे. पुणे येथील टीएनटी इफ्रा या कंपनीकडून हे काम सुरु आहे. मार्च 2020 पर्यंत ग्रेड सेपरेटरचे काम शंभर टक्के पूर्ण होईल असा इन्फ्राच्या सूत्रांचा दावा आहे. प्रारंभी बऱ्यापैकी वेगाने काम सुरु होते. कामाचा वेग साधारणपणे वर्ष ते सव्वा वर्षभराच्या कालावधीत नक्कीच चांगला होता.

खडक फोडण्यातच बराच वेळ गेला काही ठिकाणी अंर्तगत जलस्रोत उघडे पडले त्याची तजवीज वाढल्याने बजेट वाढले असे कंपनी सूत्रांनी स्पष्ट केले. ग्रेड सेपरेटरचे काम मुदतीत किंवा लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे. याचे कारण या कामामुळे शिवाजी सर्कलला जोडणाऱ्या आठही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक अन्यत्र एक ते दोन मार्गावरुन वळविण्यात आल्याने वाहतुकीवर गेल्या दीड वर्षभरात प्रचंड ताण आला आहे. वाहतूक कोंडीने सातारकर पुरते हैराण झाले आहेत. मात्र काम सत्तर टक्के झाले असून पोवई नाका खुलू लागला आहे. ग्रेड सेपरेटरच्या खणाखणीने कोरेगाव रस्त्याची दिशा पकडली आहे.

एवढेच नव्हे तर ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे या परिसरातील दुकानदार, व्यावसायिक, किरकोळ विक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प झाले असल्याने संबंधित लोकांचे आर्थिकदृष्ट्‌या कंबरडे मोडले आहे. धुळीच्या त्रासाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कधी एकदाचे हे काम पूर्ण होते याची वाट सर्वजण पहात आहेत. साधारणपणे वर्षभरानंतर कर्मवीर पथावरुन लोणंद मार्गाकडे तसेच जिल्हा रुग्णालयाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मात्र धुळीच्या आणि खड्ड्यांच्या मार्गातून वाहनचालक मार्गक्रमण करु लागले आहेत.

दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाण्यासाठी सुध्दा रस्त्याच्या एका बाजुने अरुंद मार्ग खुला करण्यात आला आहे. राजपथावर शहर वाहतूक नियंत्रण शाखेपासून शिवाजी सर्कलपर्यंत जाण्यासाठी केवळ दुचाकींना प्रवेश देण्यात आला आहे. या मार्गावरील काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिनाभरात किंवा साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीत वेगाने काम झाल्यास ते पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता सध्यातरी दिसू लागली आहे. त्यामुळे लवकरच राजपथ वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता बळावली आहे. या मार्गावर महाराजा सयाजी हायस्कूल असून ते जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. या विद्यालयात अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यी असल्याने याठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठी वर्दळ असते. राजपथावरील काम पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होवू शकते. या बाबींचा विचार करता या मार्गावरील काम ठेकेदाराला लवकरच पूर्ण करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.