डीएसकेंचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना जामीन

पुणे(प्रतिनिधी) – गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी (वय 67) यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.

बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने एक लाख रुपयांचे जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर साक्षीदारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दबाव टाकू नये अथवा त्यांना धमकावू नये. सात दिवसाच्या आत तपास अधिकाऱ्यांकडे पासपोर्ट जमा करावा. न्यायालयाच्या परवानगीविना देशाबाहेर जाऊ नये. कारागृहातून बाहेर आल्यानंतर सात दिवसात प्रतिज्ञापत्रावर स्वतःचा राहण्याचा पत्ता सांगण्यात यावा, या अटींवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

पोलिसांनी 14 ऑगस्ट 2019 रोजी मकरंद कुलकर्णी यांना पोलीसांनी अटक केली. त्यानंतर तपास अधिकारी यांनी गुन्हयाचा तपास करत 7 नोव्हेंबर 2019 रोजी मकरंद यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. मकरंद कुलकर्णी यांनी फुरसुंगी येथील जागा शेतकऱ्यांकडून चार कोटी 87 लाख 25 हजार रुपयांना विकत घेत ती डीएसकेडीएल कंपनीस नऊ कोटी 29 लाख 83 हजार रुपयांना बेकायदेशीररित्या विक्री केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. डी.एस.कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी अशाप्रकारे डीएसकेडीएल कंपनीच्या नावाने कोटयावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात मकरंद यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर युक्तीवाद करताना अॅड. रोहन नहार म्हणाले, प्रथमदर्शनी मकरंद कुलकर्णी यांचे विरोधात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा सबळ पुरावा नाही. त्यांनी कोणत्याही गुंतवणुकदाराकडून पैसे स्विकारलेले नाहीत. डीएसके यांच्याशी संबंधित कंपनीचे काम त्यांनी सन 1993 मध्येच सोडलेले असून संबंधित गुन्हयाशी त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.