पुणे – ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुकलर्णी यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून पुणे पोलिसांचे पथक त्यांना घेऊन रात्री पुण्यात पोहोचले.
आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत संचालक असलेले त्यांचे बंधू मकरंद यांचा फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. मकरंद परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून लूक आऊट नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत होता. ते मुंबई विमानतळावरून दुबईत पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. त्यांना अटक केल्यानंतर सायंकाळी पुण्यात आणण्यात येणार असून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे कदम यांनी सांगितले.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी .एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती, पुतणी सई वांजपे, जावई केदार वांजपे, कंपनीतील अधिकारी धनंजय पाचपोर, मुलगा शिरीष कुलकर्णी, मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात 33 हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी समूहाविरोधात तिसरे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. कुलकर्णी यांच्या शहराच्या वेगवेगळ्या भागात आणखी 25 मालमत्ता आढळून आल्या असून आर्थिक गुन्हे शाखेकडून या मालमत्तांची यादी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली होती. या प्रकरणात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने न्यायालयाच्या परवानगीनंतर कुलकर्णी यांची चौकशी केली होती.