पुणे -डीएसके संचालक असलेले डी.एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (डीएसकेडीएल) ही सार्वजनिक कंपनी विकत घेण्यासाठी (टेकओव्हर) दोन बांधकाम व्यवसायिकांची नावे निश्चित झाली आहेत. त्यातील अजदान प्रॉपर्टीज प्रा. लि., क्लासिक प्रमोटर ऍन्ड बिल्डर प्रा. लि., अतुल बिल्डर्स या कंपनीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे आता डीएसकेडीएल कंपनीची मालकी “अजदान’ला हस्तांतरित होणार आहे.
रिझोलेशन प्रोफेशनल मनोजकुमार अगरवाल यांनी याबाबत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमि.ला पत्र पाठवून माहिती दिली आहे. अजदान कंपनीचा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे आपल्या रेकार्डवर घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
डीएसकेडीएल विकत घेण्याबाबतचा प्रस्ताव (रिझोलेशन प्लॅन) त्यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) सादर केला आहे. या प्रस्तावास कमिटी ऑफ क्रेडिटरची (सीओसी) मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निर्णयायासाठी एनसीएलटीकडे पाठविण्यात आला होता. त्यात मंत्रा प्रॉपर्टीज प्रा. लि., अजदान प्रॉपर्टीज प्रा. लि. आणि अजदान प्रॉपर्टीज प्रा. लि., क्लासिक प्रमोटर ऍन्ड बिल्डर प्रा. लि., अतुल बिल्डर्स यातून दोन कंपन्यांची नावे अंतिम करण्यात आली होती.
डीएसके यांच्या एकूण मालमत्तेपेकी सुमारे 95 टक्के हिस्सा हा डीएसकेडीएल कंपनीचा आहे. त्यामुळे या कंपनीची विक्री झाल्यानंतर ठेवीदारांचे व बॅंकेचे पैसे कसे परत करणार, अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींचे बांधकाम कसे व कधी पूर्ण करणार, अशा सर्व बाबी दोन्ही कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद आहेत.
प्रस्ताव 827 कोटींचा, देणी 2400 कोटी!
अजदानकडून 827 कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र मुळात ठेवीदारांचे 2,200 ते 2,400 कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे 827 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याने सर्वांना किती व कधी पैसे मिळणार, हा प्रश्न कायम आहे.
देयपेक्षा कमी रकमेचा प्रस्ताव मंजूर केला तर ठेवीदारांना किती पैसे मिळणार?. गुंतवलेली पूर्ण रक्कम मिळणार असेल तर आमचे काही म्हणणे नाही. पण, तसे होणार नसेल तर संबंधित यंत्रणेकडे दाद मागणार आहोत. गुन्हा ठेवीदारांनी दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नसतील तर या प्रस्तावाचा काय उपयोग?
– ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतीक राजोपाध्ये,
शिरीष कुलकर्णी यांचे वकील