पुणे : गुंतवणूकरांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात लिलावात काढल्या जाणाऱ्या 13 अलिशान गाड्यांपैकी आठ गाड्या डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत.
त्या गाड्या विकण्यात येऊ नये असा, अर्ज बचाव पक्षाकडून सोमवारी करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आलेला आहे.
लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीच्या आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील 8 वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत.
त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रदीप राजोपाध्ये यांनी केला आहे.
आठ वाहने शिरीष कुलकर्णी यांच्या नाही तर कंपन्यांच्या मालकीची आहे, हे लक्षात आल्यानंतर आम्ही अर्ज केला. वाहनांच्या मालकीबाबतचे कागदपत्रे सादर केल्याचे ऍड. राजोपाध्ये यांनी न्यायालयास सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी या अर्जास विरोध केला.