पुणे – डीएसके प्रकल्पातील आनंदघन या गृहनिर्माण प्रकल्पाची सहकारी संस्था म्हणून केलेली नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
एकूण 11 इमारतींचा संकुल आणि 930 सदनिकांसाठी डीएसकेच्या कंपनीतर्फे राबविणारा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे बांधकाम स्थगित होऊन 3 वर्षे उलटून गेली. अंतत: या रखडलेल्या प्रकल्पावर निधी देणाऱ्या बॅंका, ईडी आणि अन्य सरकारी कार्यालयाचा बोजा झाला आहे. अनेक कायदेशीर तंट्यामध्ये हा प्रकल्प अडकला आहे. प्रकल्पाचे जेमतेम 30 ते 40 टक्के काम झाले आहे. या प्रकरणात अर्जदार स्वाती मुळे यांच्या वतीने ऍड. गणेश रायकर यांनी बाजू मांडली.
काही लोकांनी कायद्याचे उल्लंघन करून सहकारी गृहरचना संस्था नोंदणीचे प्रयत्न केले. मात्र, सह निबंधक सहकार विभाग सुनीता डोंगरे यांच्याकडे झालेल्या सुनावणीत नोंदणीत अनेक त्रुटी आढळल्यामुळे, तसेच जप्तीची महिती दडवून ठेवल्याने संस्था नोंदणी रद्दचा आदेश देण्यात आला आहे.
स्वाती मुळे यांच्या वतीने श्रीराम मुळे म्हणाले, “सदनिकाधारकांना फसवणूक करून आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध, कागदपत्रांची अफरातफर करून सभासद म्हणून दाखविण्यात आले होते. यामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आणून दिल्यानंतर वरील आदेश देण्यात आला.’