न्यायालयाचा आदेश : शनिवारी होणार होता लिलाव
पुणे : आकर्षक परताव्याच्या अमिषाने 32 हजारहून अधिक ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी ऊर्फ डीएसके प्रकरणात चार अलिगान गाड्यांच्या लिलावाला स्थगिती मिळाली आहे. तुर्तास चार गाड्यांना लिलावातून वगळण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे. शनिवारी (ता. 15) या वाहनांचा लिलाव होणार होता.
स्थगिती दिलेल्या वाहनांमध्ये दोन बीएमडब्ल्यू, एक पोर्शे आणि टोयोटा कंपनीच्या एका वाहनाचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. लिलाव करण्यात येत असलेली तेरापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे ती विकण्यात येऊ नये असा, अर्ज बचाव पक्षाकडून ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांनी तीन फेब्रुवारी केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने चार वाहने लिलावातून वगळली आहे.
लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीची आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील आठ वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत.
त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी या अर्जातून शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी न्यायालयात केली होती.