दुबई पालिकेचा निर्णय इतरही अनेक निर्बंध जारी
दुबई: दुबईमधील स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून दुबई स्थानिक स्वराज्य संस्थेने अनेक नियम जाहीर केले असून त्याप्रमाणे बाल्कनीत कपडे वाळत घालण्यास बंदी करण्यात आली आहे.
हा नियम कोणी मोडला तर त्याला मोठ्या प्रमाणावर दंडही ठोठावण्यात येणार आहे. दुबईमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक वास्तव्य करीत असल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानण्यात येत आहे. कारण बालकनीत कपडे वाळत घालण्यात भारतीय रहिवासी आघाडीवर आहेत दुबई पालिकेने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे बाल्कनीत उभे राहून तुम्हाला धूम्रपान करता येणार नाही किंवा धूम्रपान करताना जर सिगरेटची राख बाल्कनीतून खाली सांडली तर मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्यात येणार आहे.
बाल्कनीतून रस्त्यावर जर कचरा फेकला किंवा सिगरेटची राख फेकली तर तब्बल तीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्या बाल्कनीचा चुकीचा उपयोग करू नये अशा स्पष्ट शब्दात स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सूचना केल्या आहेत.
बाल्कनी धुण्याचे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारे पाणी खाली सांडता कामा नये अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच बाल्कनीत किंवा फ्लॅटच्या आजूबाजूला लावलेल्या एसीमधून पाणी ठिबकण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. एसीचे पाणी जर अशाप्रकारे खाली कुठे पडले तर याबाबतही मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुबई पालिकेने जे हे विविध नियम तयार केले आहेत. त्या नियमांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपासून तीस हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.