वृक्ष प्राधिकरणालाच ‘वाळवी’

सुनावण्या होईनात, नागरिकही वैतागले

गायत्री वाजपेयी

पुणे – शहरातील वृक्षांचे योग्यप्रकारे संवर्धन व्हावे, तसेच धोकादायक आणि विकास कामांसाठी आवश्‍यक वृक्षांना तोडण्याची परवानगी देण्याबरोबरच त्यांची पुनर्लागवड करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वृक्ष प्राधिकरण या स्वतंत्र विभागाकडे आहे. मात्र, महापालिका आयुक्‍तांचे होणारे दुर्लक्ष आणि पूर्ण वेळ अधिकाऱ्याच्या अभावामुळे वृक्ष प्राधिकरणाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या अनास्थेमुळे शहरातील नागरिक वृक्ष लागवडीपासून परावृत्त होत असल्याचे निराशाजनक चित्र समोर येत आहे.

शहरातील वृक्ष लागवड, संवर्धन आणि आवश्‍यक ठिकाणी वृक्षतोडीचे काम शास्त्रीय पद्धतीने होईल, याची जबाबदारी वृक्ष प्राधिकरणाकडे असते. यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची नेमणूकही केली जाते. मात्र, पुणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आहे कुठे? असा प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे. “प्राधिकरणाकडून आवश्‍यक परवानग्यांसाठी नागरिकांनी सातत्याने कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही अधिकारी उपलब्ध नसतात. परिणामी, परवानगी आणि इतर कामांना विरोध होत असून समितीबाबत नकारात्मकता वाढत आहे,’ अशी माहिती खुद्द समितीच्या सदस्यांनी दिली आहे. याठिकाणी पूर्ण वेळ अधिकारीच नसल्याने ही समस्या उद्‌भवल्याचेही समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे.

आयुक्‍त दखलच घेत नाहीत…
वृक्ष प्राधिकरणाकडे अनेक प्रकरणे गेली सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. परिणामी, वारंवार चकरा मारूनही काम होत नसल्याने नागरिक निराश होताहेत. त्यातून अनधिकृतपणे वृक्षतोडीचे प्रमाण वाढत आहे. समिती सदस्यांनी याबाबत सातत्याने तक्रारी देऊनही आयुक्त सौरभ राव यांच्याकडून याची दखल घेतली जात नाही, असे समितीचे सदस्य धनंजय जाधव यांनी सांगितले.

कामाचे केंद्रीकरण व्हावे
वृक्ष प्राधिकरणाची कामे क्षेत्रीय कार्यालयानुसार विभागण्यात आली आहे. वृक्ष लागवड असो, की ती तोडीची परवानगी असो. याबाबतच सर्व कामकाज क्षेत्रीय कार्यालयामार्फत पार पडते. अशावेळी या संबंधित सर्व कागदपत्रे ही क्षेत्रीय कार्यालयात असतात. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यालयात वृक्षतोडी अथवा लागवडीसंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच एखाद्या प्रकरणाबद्दल माहिती घ्यायची असल्यास त्या सदस्याला संबधित क्षेत्रीय कार्यालयातच जावे लागते. मग प्राधिकरण असून उपयोग काय? वृक्ष प्राधिकरण समितीचे कामकाज समितीच्या कार्यालयातूनच झाले पाहिजे, असे मत समितीचे सदस्य मनोज पाचपुते यांनी व्यक्त केले.

उपलब्ध अधिकारीही प्रभारीच
वृक्ष प्राधिकरण समितीच्या वृक्षाधिकारी पदाचा अतिरिक्त भार हा वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख गणेश सोनुने यांच्याकडे आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात सोनुने हे एकदाही प्राधिकरणाच्या कार्यालयात फिरकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बैठका, सुनावण्यांच्या अभावामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

संकेतस्थळही “आऊटडेटेड’
एकीकडे स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांना प्रोत्साहन देणारी पुणे महापालिकेच्या प्राधिकरण विभागाला हे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्‍न आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची, सदस्यांची नावे, प्राधिकरणाची कामे, योजना यांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याबाबत आयुक्तांना सातत्याने सांगण्यात येते, मात्र आयुक्त या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे समिती सदस्यांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.