पुणे– करोना साथीला प्रतिबंध करणाऱ्या भारत बायोटेककडून कोवॅक्सिन या लसीचे उत्पादन पुण्यातील मांजरी येथील कंपनीत सुरू होणार आहे. ऑक्टोबरमध्ये लस निर्मितीची प्रायोगिक चाचणी (ड्राय रन) सुरू होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत लसीची निर्मितीसाठी लागणारे शास्त्रज्ञ, संशोधक, इंजिनिअरसह इतर आवश्यक ते मनुष्यबळाची उपलब्धता झाली आहे. या कंपनीतील मशीनची तपासणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
करोनापासून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. लस उत्पादनाची गरज आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन भारत बायोटेकला राज्यात लस उत्पादन सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका प्रशासन पार पाडत आहे.
मांजरी येथील कंपनीमध्ये मशिनरीची तपासणी सुरू आहे. लसीच्या वितरणासाठी रिकाम्या कुप्या (वायल्स) मागवण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला आवश्यक त्या बहुतेक परवानगी मिळाली आहे. उर्वरित परवानगी लवकरच मिळेल, अशी आशा आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लस निर्मितीची प्रायोगिक चाचणी केली जाणार आहे. प्रायोगिक चाचणीच्या अहवालानंतर प्रत्यक्ष लस निर्मिती केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
देशावरील करोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या इंटरवेट इंडिया प्रा लि. (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्यावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने करोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले.