कोविड लसीकरण मोहिमेच्या रंगीत तालमीची आयुक्तांनी केली पाहणी
येरवडा – कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात केंद्र सरकार लवकरच करणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून राज्यातील अनेक महापालिकेच्या रुग्णालयात शुक्रवारी लसीकरणाची “ड्राय रन’ (रंगीत तालीम) घेण्यात आली. येरवडा येथील पुणे महापालिकेच्या भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालयातही अशी रंगीत तालीम घेण्यात आली. या ड्राय रनमध्ये 25 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लस वगळता इतर संपूर्ण प्रक्रियेची रंगीत तालीम घेण्यात आली.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी या लसीकरण चाचणीची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोविड लसीकरणासाठी तयारी झालेली असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या लसीकरणाच्या नोंदीसाठी तसेच लस दिलेल्या रुग्णांच्या माहितीसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे, याचेही प्रशिक्षण यावेळी देण्यात आले आहे.
मेडिकल अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक असे लसीकरणासाठी कर्मचारी कार्यरत असणार असून पहिल्या टप्प्यात पुणे महानगर पालिकेच्यावतीने 180 बुथ तयार करण्यात येणार आहेत तर प्रत्येक बुथमध्ये 5 कर्मचारी असणार आहेत. साधारण 15 हजार आरोग्य सेवकांना ही लस देण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
लसीकरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या बुथमध्ये खासगी हॉस्पिटलचाही समावेश करण्यात येईल, जेणेकरुन लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन अनेक नागरिकांना याचा लाभ देता येईल, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.