पुणे – सुक्या मेव्याला फारशी मागणी नाही. त्यामुळे मागील महिनाभरात बदाम, काजू, चारोळी, बेदाणाच्या आदीच्या भावात सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. तर, जर्दाळूचे भाव निम्म्यावर आले आहेत. दरम्यान, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानातून आयात होणाऱ्या खारकेवरील आयातशुल्क शासनाने 200 टक्क्यांनी वाढविल्याने खारीक मात्र महागली आहे.
मार्केटयार्ड येथील भुसार बाजारात कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, ओरिसा, केरळ, कोकण येथून काजू, अमेरीकेतील कॅलिफोर्निया येथून बदाम, इराणमधून पिस्ता, अफगाणिस्तानातून बेदाणा, अंजीर आणि जर्दाळू, सांगली विजापूर, पंढरपूर येथून बेदाणा, काश्मीर येथून अक्रोड तर छत्तीसगढ, मध्यप्रदेशातून चारोळीची आवक होत आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने सुकामेव्याला कमी प्रमाणात मागणी होत आहे. त्यातुलनेत आवक मोठी असल्याने सर्व प्रकारच्या सुकामेव्याचे भाव घसरले आहेत. यामध्ये, जर्दाळूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. महिनाभरापूर्वी जर्दाळू 600 ते 700 रुपये प्रति किलो भावाने विकले जात होते. ते आज 250 ते 240 रुपये विकण्यात येत आहे. त्याचे भरघोस उत्पन्न झाल्याने किंमती निम्म्याने घसरल्याचे व्यापारी राजेंद्र शिंगवी यांनी सांगितले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबद्दल भारतात तीव्र असंतोष पसरला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पाकिस्तानातून होणाऱ्या आयातीवर 200 टक्के शुल्कवाढ केली आहे. त्यामध्ये खारकेचा समावेश आहे. त्यामुळे तिच्या किमती दुपटीने वाढल्या असल्याचे शिंगवी यांनी नमूद केले.