खुशखबर ! शासनाचा हा निर्णय देणार तळीरामांना आनंद

एका व्यक्‍तीस 31 हजार 200 मिलिलिटर बिअर वाईन 12 हजार मिलिलिटर

नगर – देशी व विदेशी दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌वस्त होत असतानाच शासनाने दारू माफियांसाठी खुशखबर ठरणारा तर तळीरामांसाठी आनंद देणारा निर्णय घेतला आहे. एकीकडे वाइन बारवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यासह विविध निर्बंध लादण्यात येत आहेत, तर दुसरीकडे एका व्यक्‍तीस तब्बल 31 हजार 200 मिलीलीटर तर 12 हजार मिलीलीटर स्पिरीट बाळगण्यास मुभा दिल्याने हा निर्णय दारू माफियांच्या पथ्यावर पडणारा आहे.

एका दारू माफियाकडे 100 ते 200 कामगार असून, हा दारू माफिया आता दारूची अवैधरीत्या वाहतूक करून शासनाच्या निर्णयाचा पुरेपूर फायदा घेणार असल्याचे वास्तव आहे. उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार एकावेळी एक व्यक्‍ती देशी दारूचे दोन युनिट म्हणजेच 2 हजार मिलीलीटर तर बिअर व वाइनचे 12 युनिट म्हणजेच 31 हजार 200 मिलीलीटर दारू बाळगण्यास मर्यादा देण्यात आली आहे. तर स्पिरीट (आयएमएफएल व आयात केलेले मद्य), ताडी आणि अल्कोहोल असलेले द्रव्य 12 युनिट म्हणजेच 12 हजार मिलीलीटरपर्यंत दर आठवड्याला बाळगण्यास मुभा देण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने देशी व विदेशी, वाइन आणि बिअर बाळगण्यासाठी जी मर्यादा ठेवलेली आहे, ती दारू माफियांच्या पथ्यावर पडणारी आहे. पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर केलेल्या आतापर्यंतच्या कारवायांमध्ये किरकोळ किमतीची दारू जप्त केली आहे; मात्र आता एका आठवड्यात एक व्यक्‍तीला तब्बल 10 हजार रुपयांपर्यंतची दारू बाळगण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बिअर बार, वाइन शॉप यांच्यापेक्षा दारू माफियांसाठी हा निर्णय चांगलाच फायद्याचा राहणार असल्याचे वास्तव आहे.
देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांकडे 5 ते 10 हजार रुपयांच्या मर्यादेतच दारू वाहतुकीसाठी असल्याचे आतापर्यंत झालेल्या कारवाईच्या आकडेवारीवरून तसेच मुद्देमाल जप्तीवरून समोर आले आहे.

त्यामुळे यापुढे दारूची अवैध वाहतूक किंवा विक्री करणाऱ्या एखाद्यास पोलिसांनी किंवा उत्पादन शुल्क विभागाने पकडले आणि त्याच्याकडे त्या आठवड्यातील मर्यादेपेक्षा कमी दारू असेल तर पोलिसांना कारवाईसाठी अडचणीचे होणार आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोणत्या व्यक्तीला कोणत्या आठवड्यात पकडण्यात आले, याचे रेकॉर्ड ठेवणेही मोठे जिकिरीचे राहणार आहे. त्यामुळे दारू बाळगण्यासाठी दिलेली भरमसाठ मुभा ही दारू माफियांच्या पथ्यावर पडणारी असल्याचे वास्तव आहे.

एक युनिटचे मिलीलीटर…देशी मद्याचे एक युनिट म्हणजेच 1 हजार मिलीलीटर, स्पिरीट 1 हजार मिलीलीटर, अल्कोहोल असलेले द्रव्य 1 हजार मिलीलीटर, ताडी 1 हजार मिलीलीटर तर बिअरचे एक युनिट म्हणजेच तब्बल 2 हजार 600 मिलीलीटर आणि वाइनचे 1 युनिट म्हणजेच 2 हजार 600 मिलीलीटर ठरविण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.