पुणे, {प्रभात वृत्तसेवा – सतत त्रास देणाऱ्या मद्यपी पतीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना सिंहगड रस्ता भागात रविवारी घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले.
किरपा बिप्त ( ४२, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी हिरा बिप्त (४६) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऱ्हे- मानाजीनगर परिसरात स्वप्नपूर्ती रेसिडन्सी सोसायटीत किरपा हा रखवालदार होता.
मद्यधुंद अवस्थेत तो पत्नी हिराला नेहमी त्रास द्यायचा. या वरुन त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाले. यामध्ये हिरा हिने चाकूने पती किरपावर वार केले.
या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात नेले. पण, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली.