सासवड -थापेवाडी (ता. पुरंदर) येथील गावानजीकच्या बंधाऱ्यामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या देवेंद्र रावल (मुळ रा.नेपाळ, सध्या रा. पुणे, वय 25) याचा बुडून मृत्यू झाला. मयत देवेंद्र याचा मित्र शिवाजी चौधरी याने सासवड पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली आहे.
सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि.11) कामाला सुट्टी असल्याने मयत देवेंद्र व त्याचा मित्र शिवाजी हे दुपारी 1:30च्या सुमारास पुण्यातून मोटारसायकलवर फिरायला जाण्यासाठी निघाले. खेड शिवापूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये दोघेही दारू पिऊन आस्करवाडी-थापेवाडी शिवेवरील नदीच्या बंधाऱ्यात ब्राह्मण दरा येथे गेले, त्यावेळी सायंकाळचे 05:45 वाजले होते, दारूच्या नशेत दोघेही पाण्यात पोहत होते. त्यानंतर ते बाहेर आले. मात्र, शेवटचा सूर मारून येतो, असे म्हणून देवेंद्र याने पाण्यात उडी मारली. मात्र, तो बाहेर आला नाही. शिवाजी याने आजुबाजूच्या लोकांना याबाबत माहिती दिली. परंतु, देवेंद्र याचा शोध लागला आहे. त्यानंतर सासवड पोलिस ठाण्यामध्ये खबर दिल्यानंतर पोलिसांनी पुणे येथील पीएमआरडीएच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले. या पथकाच्या मदतीने मयत देवेंद्रचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.