– विनोद मोहिते
इस्लामपूर – इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या सांगली येथील आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेल्या पुणे स्थित मद्यधुंद तरुणीने शहरात पेठ-सांगली रस्त्यावर धिंगाणा घातला. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल्यावर प्रेमात वेड्या झालेल्या त्या तरुणीने त्या मजनूसाठी तब्बल तीन तास संपूर्ण पोलिस ठाणेचं डोक्यावर घेतले. तू मला पाहिजे आहेस. असे त्याला मोबाईल वरून धमकावत होती. तिची काही काळाची मजा.. पोलीसांना सजा ठरली. रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांच्या संपर्कात पोलीस होते. तिचे नेमके करायचे तरी काय ? असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
त्याचे असे झाले २० वर्षीय युवती मूळची लातूरची आहे.तीच्या कडील आधारकार्ड वरून पुणे परिसरात वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. अंगात पांढरा टी-शर्ट अन् निळ्या रंगाची जीन्स परिधान करून होती. ती दारूच्या नशेत असल्याने सतत आरडाओरडा करीत होती. मी तीन दिवसांपूर्वी सांगली-मिरजला आली असल्याची सांगत होती.
सुरवातीला दारूच्या नशेत असल्याने महिला पोलिसांनी तिला बसवून ठेवले होते. तिची दारू उतरवण्यासाठी तोंडावर पाणी मारले.. कोरा चहा पाजला.पण ती नशेतून बाहेर पडतच नव्हती. वेळ जाईल तशी ती अस्वस्थ होत होती.आपल्या बॉयफ्रेंडला मोबाईल वरून संपर्क करून शिव्यांची लाखोली वाहत होती..अधून मधून रडून तूच मला पाहिजेस असे ठणकावून सांगत होती.आपण पोलीस ठाण्यात अडकलोय असे सांगूनही “तो” इंस्टाग्रामवरील बॉयफ्रेंड येता येत नव्हता. त्यामुळे ती जास्तच विमनस्क होत होती.
काही काळासाठी तिला लोखंडी दरवाजातून आत ठेवल्यावर ती अधिकच आक्रमक झाली. दरम्यान महिला पोलीस महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित सत्कार स्वीकारण्यासाठी पोलीस उपाधीक्षक कार्यलयात गेल्या होत्या. ही संधी साधून त्या तरुणीने लोखंडी दरवाजातून आत हात घालून कडी काढत पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातला.
कोणीही महिला पोलीस तिथे नसल्याने पुरुष पोलिसांना तिला कसा अटकाव करायचा असा प्रश्न पडला. तिने ठाणे अंमलदार यांच्या समोर येत पुन्हा गोधळ घातला.अन् रागाच्या भरात मोबाईल फोडला. कचऱ्याची बादली विस्कळीत केली.
बार मालकाला ९५० रुपयांचा लावला चुना
शहरात पेठ-सांगली रस्त्यावर एका बियर बारमध्ये बसून तिने मद्यपान केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथेही तिने बार मालकाला सुमारे ९५० रुपये बिल दिलेच नाही.त्याला चुना लावत तिथूनच रस्त्यावर धाव घेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. नागरिकांनी पोलिसांत कळवल्यावर महिला पोलिसांनी तिला पाठलाग करून ताब्यात घेत रिक्षात बसवून तिला पोलीस ठाण्यात आणले. आणि उचलून एका स्वतंत्र खोलीत बसवले.
महिला दिन सत्कार अन् मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
इस्लामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसांचा महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार होता. तो स्वीकारण्यासाठी सर्व महिला पोलीस उपाधीक्षक कार्यलयात गेल्या होत्या. त्याच दरम्यान ” त्या “मद्यधुंद तरुणीने पोलीस ठाण्यात प्रचंड धिंगाणा घातला. स्वतःचा किंमती मोबाईल फोडला. कचरा कुंडी विस्कटून टाकली. लोखंडी बाकड्याची आदळआपट केली.
उपस्थित पुरुष पोलिसांना नेमके करायचे काय प्रश्न पडला. कोणीतरी महिला पोलिसांना निरोप धाडला. अन् धावतच आलेल्या महिला पोलिसांनी तिला उचलून एका खोलीत नेले. अन् पोलिसी खाक्या दाखवला. काही वेळ तिचे समुपदेशनही केले.