अंमली पदार्थ विरोधी पथकाची शेल पिंपळगावमध्ये कारवाई
पिंपरी – विक्रीसाठी आणलेले २० कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेल पिंपळगावमध्ये बुधवारी (दि.७) दुपारी ही कारवाई केली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण-आंबेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता.शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी बुधवारी (दि. ७) याबाबत चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी सेल पिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून पोलिसांनी पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला.
तसेच गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार रोख २३ हजार १०० असा एकूण २० कोटी पाच लाख २३ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.