येरवड्यातील प्रकार; भाजीमंडई रस्त्यावर पत्रे लावल्याने नागरिकांची गर्दी
येरवडा – येरवडा परिसरातील कंटेन्मेंट झोन वगळून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 5 वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी आहे; परंतु, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी या भागात येऊ नयेत यासाठी औषधांसह अन्य दुकानेही दुपारी दोन वाजताच बंद केली जातात. मात्र, येथील देशी दारूची दुकाने संध्याकाळपर्यंत खुली असतात त्यामुळे पोलीस आणि पालिका प्रशासन या दोघांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा आहे.
येरवडा प्रभाग 6 “हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर येथे पालिकेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, नगरसेवक यांनी परिसराची पाहणी करून प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून येरवडा प्रभाग 6चा काही भाग वगळला. यानुसार येरवडा गावठाण भाजी मंडई आणि गाडीतळ भागातील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
परंतु, परिसरातील दारूची दुकाने संध्याकाळपर्यंत सुरू असतात. यातूनही करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असून अशा दुकानांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कंटेन्मेंट भाग पत्रे लावून सील करण्यात आला असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, नगरसेवक अविनाश साळवे यांनी सांगितले.