मुंबई – मुंबई पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धडक कारवाई करून मेफेड्रोन या अंमली पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. त्या कारवाईवेळी तब्बल 1 हजार 26 कोटी रूपये किमतीचा 513 किलो मेफेड्रोन साठा जप्त करण्यात आला.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने 13 ऑगस्टला गुजरातच्या अंकलेश्वरमधील कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी मेफेड्रोनचा (एमडी) मोठा साठा आढळला. त्या कारखान्याचा मालक गिरीराज दीक्षित याला अटक करण्यात आली.
रसायनशास्त्राची मास्टर्स डिग्री मिळवणाऱ्या दीक्षितने काही प्रयोग करून मेफेड्रोनची निर्मिती करणारा फॉर्म्युला बनवल्याचे चौकशीतून समोर आले. मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे व्यापक ड्रग रॅकेट उघडकीस आले आहे. त्या रॅकेटचा सुगावा सर्वप्रथम मुंबई पोलिसांनी मार्चमध्ये मुंबईच्या गोवंडी परिसरात केलेल्या कारवाईतून लागला. त्यावेळी एका ड्रग विक्रेत्याकडून 250 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.
त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील एका कारखान्यावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी तब्बल 1 हजार 400 कोटी रूपये किमतीचे 700 किलो एमडी जप्त करण्यात आले. त्या रॅकेटचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहचल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुढील कारवाई केली. संबंधित रॅकेटचा भाग असणाऱ्या 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.