श्रीनगर : भारतीय सुरक्षा दल आणि पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील बदगाम जिल्ह्यात अंमलीपदार्थ दहशतवादाचे मोड्यूल उद्ध्वस्त केले. जैश ए महंमदच्या सहा दहशतवाद्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
या अतिरेक्यांचा त्यांच्या पाकिस्तानातील हॅंडलरशी निकटचा संबंध होता. अंमलीपदार्थांची तस्करी, शस्त्रांचा पुरवठा आणि जैशच्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम ते करत असत. राज्य पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि लष्कराने मिळालेल्या विश्वासार्ह खबरीवरून ही कारवाई केली. जिल्ह्यातील चदुरा भागात या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. मुद्दसर फैय्याज, शाबीर गनी, सगीर अहमद पोस्वाल, इश्क भट, अर्शिद ठोकर या पाचजणांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून चिनी बनावटीचे पिस्तूल, हातबॉम्ब, एक किलो हिरॉईन, एक लाख 55 हजारांची रोकड आदीसह शस्त्रे आणि अंमलीपदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे तस्कर आणि दहशतवाद्यातील संबंधांवर प्रकाशझोत पडला आहे.