बॉलिवूड…स्वप्ननगरी… लाखो-करोडो लोकांसाठी स्वप्नवत वाटणाऱ्या या मोहमयी दुनियेचे ओंगळवाणे स्वरूप सध्या चर्चेचे कारण बनले आहे. बॉलिवूड नामक या स्वप्नजागतातील दाहक वास्तव अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाने समोर आलं आहे. अनेक वृत्त माध्यमांसाठी तर सुशांत प्रकरण देशातील एक अत्यंत महत्त्वाचं (?) प्रकरण बनलं आहे. त्यातही सुशांतच्या मृत्यूच्या निमित्ताने सध्या सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती बॉलीवूडच्या परंपरागत ड्रग्स कनेक्शनची! पैसा, प्रसिद्धीबरोबरच येणारी ‘व्यसनाधीनता’ हे चित्रपटसृष्टीला लागलेलं ग्रहणच म्हणावे लागेल.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाला अडीच महिने उलटून जात असताना बॉलीवूडनामक विशाल महासागराचे विविध माध्यमाद्वारे मंथन सुरु आहे. सुशांतच्या तथाकथित आत्महत्येने अवघी चित्रपटसृष्टी ढवळून निघाली असून दररोज नवनवीन प्रकरणे बाहेर पडत आहेत. सुशांतच्या आर्थिक व्यवहाराची सूत्रेच नाही, तर त्याच्या आयुष्यातील सर्व निर्णय घेणारी आणि त्यामुळेच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली सुशांतची मत्रीण रिया चक्रवर्ती सातत्याने सुशांत ड्रग्स घेत असल्याचा दावा करताना दिसतेय.
गम्मत म्हणजे खुद्द ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती दोघेही त्यांच्या व्हॉट्स अप चॅटद्वारे ड्रग्स घेत असल्याचे तसेच ड्रग्स पुरवठा करणाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या ‘हाय प्रोफाइल’ प्रकरणात आधी मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्या तपासानंतर कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्यामुळे शेवटी सुशांतच्या कुटुंबियांच्या आग्रही मागणीमुळे न्यायालयाने सीबीआय संस्थेच्या हाती हे प्रकरण सोपवले. सीबीआयकडून दररोज संशयितांची चौकशी सुरु असतानाच आता मादक पदार्थ नियंत्रण विभाग अर्थात एनसीबीही संशयितांची चौकशी करीत आहे.
शुक्रवारी (दि. ४) रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीने छापा घालून तिच्या भावाला म्हणजे शौविक चक्रवर्तीला आणि सुशांतचा नोकर सॅम्युएल मिरांडा याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तसेच त्यांना अटक देखील केले. याप्रकरणात रिया चक्रवर्तीलाही अटक होऊ शकते. या प्रकारामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे.
कारण या प्रकरणात आणखीही बरेच नवीन मुद्दे आणि नवीन नावे पुढे येऊ शकतात. शुक्रवारीच कन्नड चित्रपटसृष्टीतही ड्रग्स प्रकरणाशी संबंधित एक खळबळजनक घटना घडली. तेथील अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिच्या घरी कर्नाटक पोलिसांच्या क्राईम ब्रँचने छापा घालून तिला अटक केली. एकूणच बॉलिवूड असो की टॉलीवूड, ड्रग्सच्या विळख्यात अनेक बडी मंडळी सापडलेली आहेत, हे स्पष्ट होतेय.
ड्रुग्स म्हणजे नेमके काय ?
ड्रग्स म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे औषधांना वैद्यकीय भाषेत ड्रग्स म्हटले जाते. मात्र, जे पदार्थ मादक किंवा अंमली आणि आरोग्यास अत्यंत हानिकारक असतात, तरीही सुखद भावना किंवा उल्हासित, उत्तेजित करणारे भाव निर्माण होण्यासाठी इनहेल, इंजेक्शन, स्मोकिंग किंवा थेट सेवन केले जातात, अशा मादक पदार्थांनाही ड्रग्स म्हणतात.
महानगरांत ड्रग्स विक्रेते (ड्रग्स पॅडलर) महाविद्यालयीन तरुणांना पब, डिस्को,अशा विविध ठिकाणी लक्ष्य करून त्यांना ड्रग्स पुरवितात. एमडी, कोकेन, फेंटानल, मारिजुआना, चरस, गांजा, हशीश असे अनेक प्रकारचे ड्रग्स आजही बिनदिक्कत विकले आणि सेवन केले जात आहेत. तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या अशा अंमली पदार्थांची विक्री करणे म्हणजे गंभीर गुन्हा आहे. मात्र, झटपट पैसा मिळवून देणाऱ्या या पदार्थांच्या विक्रीत लाखो तरुण गुंतले आहेत.
सुशांत प्रकरणाच्या माध्यमातून समोर येणाऱ्या अंमली पदार्थाच्या मुद्द्यामुळे बॉलिवूडमध्ये बिनधास्तपणे होणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांचीही चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, ६०-७०च्या दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत ड्रग्सवर आधारित अनेक चित्रपट येत गेले.
या चित्रपटाद्वारे ड्रग्सच्या विळख्यातून तरुण पिढी कशी मुक्त व्हायला हवी, याबाबतचे विचार मांडले गेले होते. ‘हरे राम, हरे कृष्ण’, ‘चरस’, ‘जाँबाज’, ‘जलवा’, ‘फॅशन’, ‘देव डी’, ‘पंख’, ‘दम मारो दम’, ‘गो गोवा, गॉन’, ‘उडता पंजाब’, अगदी अलीकडे येऊन गेलेला ‘संजू’ असे अनेक चित्रपट ड्रग्सवर आधारित होते. मात्र, लोकांना ड्रग्सपासून परावृत्त करण्यासाठी दिशा दाखवणाऱ्या मंडळींनीच ड्रग्स पार्ट्या आयोजित करून विरोधाभासी वर्तणूक केल्याचीही उदाहरणे दिसतात.