ड्रग्ज माफियांना पोलीसच देतात सवलतीचे ‘इंजेक्‍शन’

झाडाझडती संपेपर्यंत सहलीला जाण्याचा अजब सल्ला


पोलीस आयुक्‍तांच्या मनसुब्यांना अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सुरुंग

– संजय कडू

पुणे – शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्‍तांनी कंबर कसली आहे. अवैध व्यवसाय तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे)अशोक मोराळे यांनी विशेष मोहिमा राबवत गुन्हेगारांना पळता भुई थोडी केली आहे. मात्र, वरिष्ठ प्रामाणिकपणे काम करत असताना, त्याला काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यारीच सुरुंग लावत असल्याचे समोर आल्याने गुन्हे शाखेसह पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

प्रकरण काय?
मागील काही दिवसांत अंमली पदार्थ विक्रीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही झाडाझडती घेतली गेली आहे. यातील काही सराईतांना मात्र अंमली पदार्थ विरोधी पथकातील मर्जीतील कर्मचाऱ्यांनी बोलावून घेत “झाडाझडती सुरू असेपर्यंत गावाला किंवा पर्यटनाला जा’ असा सल्ला दिला. यामुळे हे सराईत झाडाझडतीत सापडणार नाहीत, तसेच नव्याने गुन्हा दाखल होणार नाही. ही बाब एका व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशनाला आलेल्या ड्रग्ज युजर आणि सप्लायरने सांगितली. हा तरुण व्यसनाच्या मार्गाने तस्करीकडे वळलेला आहे.

पिंपरी-चिंचवड ड्रग्जचे “हब’, तर पुणे बाजारपेठ
सर्व प्रकारचे हाय-प्रोफाइल ड्रग्ज मुंबईमार्गे पुण्यात येते. ते प्रथम नवी सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडीत उतरवले जाते. तेथून ते तस्कर विकत घेतात. यानंतर पिंपरी-चिंचवडसह पुण्यासह इतरत्र त्याची विक्री करतात. हे प्रमाण पुणे शहर हद्दीत अधिक आहे. यात कोथरुड, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, रेल्वे लाइन परिसरांत त्याची विक्री होते.

जलद पुरवठ्यासाठी “केटीएम’चा वापर
नशेच्या आहारी गेलेले तरुण पैसे संपल्यावर अंमली पदार्थ विक्रीत उतरतात. यातून मिळणाऱ्या फायद्यातून ते अंमली पदार्थाचे सेवन आणि मौजमजा करतात. सेवन ते विक्रीचे रॅकेट अशा सापळ्यात ते अडकतात. हे तरुण हिंजवडी, भूगाव आदी परिसरातील पब्ज किंवा हॉटेल्समध्ये या पदार्थाची विक्री करतात. पटकन डिलेव्हरी करता यावी, तसेच पोलिसांच्या जाळ्यात सापडू नये म्हणून ते “केटीएम’सारख्या दुचाकी वापरतात. अंमली पदार्थ तस्करीत नव्याने दाखल झालेल्यांची माहिती पोलिसांना आहे. मात्र, त्यांना रेकॉर्डवर न आणण्यासाठी तजवीज केली जाते.

स्थानिक तस्करांची पाठराखण करतंय कोण?
मुंबईपाठोपाठ अंमली पदार्थांचा सर्वाधिक बाजार पुण्यात चालतो. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आकडेवारी बघता गांभीर्य समजणार नाही. कारण, कारवायांपेक्षा कितीतरी पटीने अधिक विक्री होत असते. अनेक तस्कर पोलिसांच्या रेकॉर्डवर नाहीत. हाय प्रोफाइल विक्रीमध्ये प्रामुख्याने नायजेरियन तरुणांचे नाव घेतले जाते. मात्र, त्यांच्याकडून एकूण विक्रीच्या फक्‍त 10 ते 20 टक्केच विक्री केली जाते. उर्वरित 80 ते 90 टक्के विक्री स्थानिक तस्करांकडून केली जात आहे. त्यांची मात्र पाठराखण करतानाचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.