जागतिक अमली पदार्थविरोधी दिन
पुणे – ग्रामीण भागात अमलीपदार्थ सेवनाचे प्रमाण कमी आहे. मात्र, शहरांत यात वाढ होत आहे. मुंबई, पुण्यात किंवा अजून नवीन डेव्हलप होणाऱ्या शहरांमध्ये या व्यसनाचे प्रमाण जास्त आहे. इथे त्यांना “गर्दुले’ किंवा “चरशी’ म्हणतात. ते आपली नशा भागविण्यासाठी कोणत्याही पातळीवर जावू शकतात किंवा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. यामुळे ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त अमलीपदार्थ सेवन आणि विक्रीचा आढावा घेतला असता ही बाब प्रकर्षाने पुढे आली. हे गर्दुले चोरी, लुटमार, मोबाइल चोर, महिलांच्या गळ्यातील दागिने यातून पैसे मिळवून नशा करतात. सुरुवातीला केवळ मजा म्हणून अमली पदार्थांची चव चाखणारे आज या चक्रव्युहात अडकले जात आहेत. कॉलेज विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी बरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत ही समस्या पोहोचली आहे. हायप्रोफाइल कुटुंबातील पुरूष व महिलांना याचे व्यसन लागले आहे. बाजारात नशा आणणारे अनेक पदार्थ मिळतात.
काहीजण अमलीपदार्थ शरीरात टोचून घेतात, पण कोणताही अमलीपदार्थ हा शरीरासाठी घातकच आहे. या विळख्यात गटांगळ्या खाणाऱ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासाठी 26 जून या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक कार्यक्रमांनिमित्त याविषयी जनजागृती आणि या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले जाते.
अमलीपदार्थ….
ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादकपदार्थ किंवा अमलीपदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉइन आदी पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) वगैरे आदींचा मादक पदार्थात समावेश केला जातो. स्पिरीट, व्हाइटनर, नेलपेंट रिमुव्हर, पेट्रोल असे घटकदेखील नशेसाठी वापरले जात आहेत. यापुढेही जाऊन काही लोक सिंथेटीक अमलीपदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर होत आहे.
शिवाय, मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, वेदनाशामक गोळ्या यांचाही वापर नशेसाठी होत आहे. भारतात एनडीपीएस ऍक्टनुसार (नार्कोटिक ड्रग्ज ऍन्ड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ऍक्ट) नशीले पदार्थ वापरणे गुन्हा आहे. ड्रग्ज तुम्ही तुमच्यासाठी वापरा किंवा दुसऱ्या कामासाठी वापरा, तो गुन्हाच आहे. त्याला दंड हा ड्रग्स किती प्रमाणात वापरतो याच्यावर अवलंबून असते.
आज जगभरातील देश या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. फक्त अमलीपदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा करून काहीही साध्य होणार नाही. तर, त्यानंतर त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणणेदेखील गरजेचे आहे.
– डॉ. अजय दुधाणे, अध्यक्ष, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, चंदननगर, पुणे