शेततळ्यात बुडून मृत्यूमुखी पडण्याची मालिका सुरूच

सलग तिसऱ्या दिवशी श्रीगोंद्यात माय लेकींचा मृत्यू

श्रीगोंदा – जिल्ह्यात शेततळ्यात पडून मृत्यूमुखी पडण्याची मालिका सुरू आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा तालुक्‍यातील घारगाव येथील पानसरे वस्तीवर राहणाऱ्या कमल बापू पानसरे (वय 36)व त्यांची मुलगी वर्षा बापू पानसरे (वय 16) या दोघी मायलेकींचा जनावरांना पाणी काढण्यासाठी गेले असता शेततळ्यात पडून मृत्यू झाला.

शनिवारी नगर तालुक्‍यातील अरणगावमध्ये शेततळ्यात पडून दोन बालकांचा तर रविवारी कर्जत तालुक्‍यातील घुमरी या गावात आईसह दोन मुलींना शेततळ्यात पडून मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी श्रीगोंदा तालुक्‍यात मायलेकींचा मृत्यू झाल्याने शेततळ्यात पडून मृत्यूची मालिका सुरू राहिली आहे.

याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलीप पानसरे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत बेलवंडी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घारगाव येथील पानसरे वस्तीवर राहणाऱ्या कमल पानसरे या त्यांची सोळा वर्षीय मुलगी वर्षा हिच्यासोबत गाईला पाणी पाजण्यासाठी घरापासून काही अंतरावर शेतात असणाऱ्या शेततळ्यावर गेल्या होत्या.

त्यावेळी वर्षा ही पाणी काढण्यासाठी शेततळ्यात उतरली. तेव्हा ती शेततळ्याच्या प्लास्टिकच्या कागदावरून पाय घसरून शेततळ्याच्या पाण्यात पडली. शेततळ्याच्या दाव्याच्या सहाय्याने तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता दाव तुटले. त्यामुळे वर्षाची आई कमल यांनी साडीच्या साहाय्याने वर्षाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु लेकीला वाचवताना आई पाण्यात पडली.

यात दोघींचाही शेततळ्याच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाला. एक गाई सुटून घरी आल्यामुळे कमल यांचे सासरे यांना संशय आला. त्यामुळे ते शेततळ्यावर नात व सुनेला पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना पाण्यावर हंडा तरंगताना दिसला तसेच या दोघींच्या चपला व दोघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. याबाबत बेलवंडी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पो. कॉ. ज्ञानेश्वर पठारे यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील नागरिकांच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान जनावरांना पाणी पाजण्यासाठी पाणी काढायला गेलेल्या माय लेकींचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)