पुणे जिल्ह्यातील धरणात खडखडाट

पुणे – जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती पाहता धरण क्षेत्रात वेळेत पाऊस होणे (दि.7 जून) गरजेचे आहे. मान्सून वेळेत दाखल होणार, असे अंदाज हवामान खात्याकडून वर्तविले जात असले तरी धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता जून आणि जुलै महिन्यांत पाऊस कमी झाला तर पुढील वर्षासाठी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

खडकवासला साखळी प्रकल्पांतील धरणांत उपयुक्त पाणीसाठा कमी होत असताना कुकडी प्रकल्पातील प्रमुख धरणांतही पाणीसाठा अत्यल्प आहे. यामुळे येत्या आठवडाभरात धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस होणे अत्यंत गरजेचे मानले जात आहे.

भोर तालुक्‍यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांतील पाणीसाठा संपला आहे. या धरणांत पाणी नसल्याने कालव्यांची आवर्तन बंद करण्यात आली आहेत. यामुळे संबंधीत गावांत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणांतही 34.99 टक्के पाणी आहे. दौंड, हवेली आणि इंदापुरातील काही भागाला खडकवासला धरणांतून शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा दि. 27 मे पासून थांबविण्यात आला आहे. खडकवासला जुना आणि नव्या कालव्याला पाणी कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. भामाआसखेड, चासकमान आदी धरणांतील पाणीपातळीही खाली गेली आहे. उजनी धरणांची पातळीही चिंताजनक असून उजनी परिसरातही पावसाची आवश्‍यकता आहे.

जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या उजनी धरण क्षेत्रात साधारणत: जुलैच्या अखेरीस पावसाची हजेरी असते. यंदा पाऊस कधी पडतो यावर उजनीच्या पाण्याचे नियोजन ठरणार आहे. टेमघर, पानशेत, वरसगाव, पवना, चासकमान, माणिकडोह, येडगाव या धरणांतील पाणीसाठा यंदा कमी झाल्याने पावसाची नितांत गरज आहे. कुकडीच्या पाण्यावरून जुन्नर व श्रीगोंदा तालुक्‍यातील वाद कायमचा आहे. कुकडी प्रकल्पातील सर्वांत मोठ्या असलेल्या माणिकडोह धरणातील उपयुक्त साठा केवळ उणे 1 टक्के असल्याने या क्षेत्रातही पावसाची आवश्‍यकता आहे.

खडकवासला धरणाच्या पाण्यावर पुणे, दौंड आणि इंदापूर हे तालुके अवलंबून आहेत. पुणे शहराला जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांत आहे. दौंड शहराचा पाणी पुरवठा भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. खडकवासलाचे पाणी इंदापूरच्या काही भागासाठी पुरविले जाते. परंतु, यावर्षी जुनपूर्वीच सर्व आवर्तने बंद करण्यात आली आहेत. पाणीसाठ्या अभावी उजनी धरणातून शहराला पाणी पुरवठा बंद असल्याने इंदापुरलाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील ही स्थिती पाहता यंदा पाऊसमानात धरणांत पाणीसाठण्यास सुरूवात झाल्यानंतर जलसंपदा विभागाला बिनचूक नियोजन करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.