श्रीरामपूर तालुक्‍यावर दुष्काळाचे ढग

टाकळीभान – एकेकाळी सुजलाम सुफलाम असलेल्या, श्रीरामपूर तालुक्‍यावर गेल्या काही दिवसांपासून दुष्काळाचे ढग जमा होऊ लागल्याने तालुक्‍याच्या दुष्काळाच्या चटक्‍यातील दाहकता वाढत आहे. दिवसेंदिवस कमी होणारा पाऊस व त्यामुळे पाणी पातळी खोलवर गेल्याने, तालुक्‍याचा मुख्य व्यवसाय असलेला शेती उद्योग संकटात सापडला आहे.
1910 नंतर झालेल्या भंडारदरा धरणाच्या निर्मितीनंतर श्रीरामपूर तालुक्‍याला सुजलाम सुफलाम्‌ होण्याचे भाग्य मिळाले होते. मुळातच अवर्षणग्रस्त असलेल्या या तालुक्‍याची शेती पाटपाण्यावरच अवलंबून आहे.

काळानुरुप होत गेलेल्या बदलामुळे वरच्या भागात उपसा सिंचन योजना वाढत गेल्याने, वरच्या भागानेही या पाण्यावर हक्क सांगितल्याने श्रीरामपूर तालुक्‍याचे पाणी कमी होत गेले. त्यातच 2005 मध्ये झालेल्या समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत, मराठवाड्यानेही भंडारदरा धरणाच्या पाण्यावर हक्क सांगितल्याने गेल्या पाच सहा वर्षात श्रीरामपूर तालुक्‍याचे शेतीचे पाणी पळवले जात आसल्याने, श्रीरामपूर तालुक्‍यातील शेतीवर दुष्काळाची छाया दाटली आहे.

श्रीरामपूर तालुका मुळातच अवर्षणग्रस्त तालुका आहे. दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्यमान शेती व्यवसायाला मारक ठरत आहे. गेल्या काही वर्षात कमी पर्जन्यमान व भंडारदरा धरणाच्या पाण्याची पळवापळवी, यामुळे तालुक्‍यातील शेतीला चांगलीच घरघर लागली आहे. ऊसशेती तर बेभरवशाची झाली आहे. त्यासोबतच खरीप व रब्बी हंगामही बेभरवशाचा झाला आहे. तालुक्‍यात औद्योगीकरण झालेले नसल्याने, संपूर्ण जनजीवन शेतीवरच अवलंबून आहे.

गेल्या पाच वर्षापासून जायकवाडीला पाणी सोडले जात आसल्याने तालुक्‍यातील शेती आवर्तने कमी झाले आहेत. त्यामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. सलग पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी पिचला जात आहे. दुष्काळाची भयावह परिस्थिती असतानाही शासनाने चार महसूल मंडळापैकी केवळ एका महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करुन, दुष्काळाच्या सवलती जाहीर केल्या आहेत. वास्तविक इतर तीन महसूल मंडळांचीही भयावह अवस्था आहे.

यंदा पाऊस सरासरीपेक्षा अत्यंत कमी पडल्याने मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरा झाल्या नाही. तीच परीस्थिती रब्बी हंगामाचीही झाली. जानेवारीत झालेल्या शेती आवर्तनामुळे रब्बीच्या पिकांनी जेमतेम तग धरला. मात्र आता मार्च सुरु होताच अनेक ठिकाणची रब्बीची पिके करपली जात आहेत. उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तालुका दुष्काळाचा सामना करीत असला तरी, दुष्काळाच्या यादीत सामाविष्ट होवून दुष्काळाच्या सवलती मिळत नसल्याने, शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.