मायणी, (प्रतिनिधी) – मायणी ता. खटाव येथील गाव हद्दीच्या बाहेर त्याचबरोबर चितळी, शेडगेवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी, सूर्याचीवाडी या गावामध्ये रात्री बारानंतरच्या सुमारास ड्रोन घिरट्या घालत असल्याचे अनेक लोकांना दिसून आले.
त्या संदर्भात पोलीस प्रशासनाला लोकांनी वेळोवेळी सांगितले आहे. पोलीस प्रशासन ही त्याचा तपास घेत आहे. मात्र, अजूनही त्या ड्रोनबाबत कोणत्याही प्रकारचा उलगडा न झाल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
पोलीस प्रशासनाने या भागामध्ये चौकशी करून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरवणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लोकांच्या मधून वाढत आहे.
यापूर्वी अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालतात आणि दुसऱ्या दिवशी त्या गावात चोऱ्या होतात असे अनेक प्रसंग घडले आहेत. या परिसरामध्येही तसे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
रात्रीच्या वेळी हे फिरणारे ड्रोन नेमके कोणाचे? कशासाठी फिरतात याचे उत्तर अजूनही जनतेला मिळाले नसून पोलीस प्रशासनाने यावर बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
लोकांना ड्रोन दिसल्यानंतर त्याचवेळी पोलिसांशी संपर्क साधनेही गरजेचे आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ड्रोन फिरवणारे नक्कीच सापडतील, यासाठी पोलीस प्रशासनाने व लोकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.
शनिवारी रात्री 12 च्या सुमारास धोंडेवाडी गावच्या हद्दीत २ ते ३ ड्रोन आकाशातून घिरट्या घेताना नजरेस आले. यापूर्वी दातेवाडी गावात सुद्धा 3 ड्रोन आकाशातून घिरट्या घेताना निदर्शनास आले होते.
रात्रीच्या वेळी आकाशातून ड्रोन फिरवून लोक जागे आहेत का नाहीत याचे निरीक्षण करुन चोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क राहून रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनवर लवकरात लवकर कारवाई करावी व लोकांच्या मनातील भीती काढावी.
सचिन घाडगे, धोंडेवाडी ता.खटाव