गणेश आंग्रे
पुणे- भूमि अभिलेख विभागाने राबविलेल्या गावठाणांतील घरांची ड्रोनद्वारे मोजणी करण्याच्या उपक्रमाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यानुसार देशभरात अशी मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गांधीजयंतीपासून म्हणजे दि.2 ऑक्टोंबरपासून होणार आहे. त्याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे 30 गावांतील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन देण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. यासाठी “सर्व्हे ऑफ इंडीया’च्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा पर्याय निवडण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावी राबविला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती.
यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनच्या वापरासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमि अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
दरम्यान, नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी पुणे जिल्ह्यातील सुमारे 30 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुरंदर तालुक्यातील 11, हवेलीमधील 12 आणि दौंड तालुक्यातील 7 गावांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी भूमी अभिलेख विभागाचे युध्द पातळीवर काम सुरू आहे.
* नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार
* मालमत्तेवर कर्ज घेणे शक्य होणार
* मालकी हक्काचा पुरावा तयार होणार
* गायरान जमिनींचे रेकॉर्ड अपडेट होणार
* पायाभूत सुविधांसाठी सरकारी जागा उपलब्ध होणार