आता कोठूनही काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स

पुणे – केंद्र शासनाच्या नवीन मोटार वाहन दुरुस्ती कायद्यातील तरतुदीनुसार आता राज्यातील कुठल्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहन परवाना (लायसन्स) काढता येणार आहे. यासाठी आजवर ज्या ठिकाणच्या कार्यालयात परवाना काढायचा आहे, त्या संबंधित ठिकाणचा रहिवासी पत्त्याची गरज होती. मात्र, सुधारित कायद्यानुसार ही अट रद्द करण्यात आल्याने परवाना मिळणे सोपे झाले आहे.

केंद्र शासनाने 1988च्या मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करून सुधारित कायदा तयार केला आहे. या कायद्याला मंजुरी मिळाली असून दि.1 सप्टेंबरपासून कायदा लागू करण्यात आला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नव्या कायद्यानुसार अनेक बदल करण्यात आले आहेत. विशेषतः वाहन परवाना काढणे, नव्या वाहनांची नोंद यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आजवर परवाना काढण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या परिक्षेत्रातील रहिवासी पत्त्याची गरज होती. यामुळे इतर जिल्ह्यातून शिक्षण, नोकरीसाठी आलेल्या नागरिकांना परवाना मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र, आता ही अट रद्द करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.