पोलिसांना दोनदा कळवूनही कारवाई न झाल्याने उचलले पाऊल
टाकळी हाजी (वार्ताहर)- पोलिसांकडे तक्रार करूनही गावामधील दारूधंदा बंद होत नसल्याने ग्रामस्थ व रणरागिनी महिलांनी एकत्र येत दारूअड्ड्यावर हल्ला चढवला.थेट महिलांनीच धंदा बंद केल्याने बेट भागात दारूधंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
शिरूरच्या पश्चिम भागातील टाकळी हाजीच्या साबळेवाडीत प्रजासत्ताकदिनी वाडीतील अवैध दारूधंदे बंद करायचेच, या उद्देशाने सुमारे चाळीस महिलांनी आक्रमक होत येथील हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोन ठिकाणांवर धडक मोर्चा नेत घराजवळील शौचालयात ठेवलेल्या गावठी दारूचे भरलेले कॅन सर्वांसमक्ष बाहेर काढून ओतून दिले. बबन कोंडीबा साबळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूधंद्यांवर ग्रामस्थांनीच केलेल्या कारवाईत ग्रामपंचायत सदस्य बाबाजी साबळे, भाऊसाहेब साबळे, सोपं औटी, पोपट साबळे, बाळू औटी, विठ्ठल साबळे, राजू साळवे, योगेश साबळे, सुरेश साबळे, योगेश औटी व स्थानिक तरुणांसह सुगंधा गुलाब साबळे, सोनल साबळे, साधना खोमणे, लता साबळे, सिंधूबाई औटी, अलका औटी, जाईबाई साबळे व इतर महिलांनी आज केलेल्या या धडक कारवाईत याकामी पाठिंबा देत बेकायदा हातभट्टी दारू विकणाऱ्यांना समज देत पुन्हा कधीही हे धंदे न करण्याच्या सक्त सूचना देखील दिल्या.
साबळेवाडीतील सर्वच महिला आक्रमक झालेल्या होत्या. वाडीनजीक असणाऱ्या या अवैध दारू विक्रीमुळे महिला, मुलांसह, शाळा व अनेकांना त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच याबाबत पोलिसांना दोनदा कळवून ही हे धंदे सुरूच राहिल्याने अखेर आज वाडीतील महिलांनीच पुढाकार घेत हे हातभट्टी विक्रीचे धंदे बंद पाडले. याकामी वाडीतील तरुण वर्ग उत्स्फूर्तपणे महिलांच्या पाठीमागे उभा राहिला. पुन्हा हे धंदे सुरु झाल्याचे निदर्शनास आल्यास याच पद्धतीने महिला व ग्रामस्थ ते बंद करतील
-बाबाजी व भाऊसाहेब साबळे, ग्रामपंचायत सदस्य