नियमित चालकाकडून मद्यप्राशन, दुसऱ्या चालकावर गुन्हा दाखल

आंबेनळी घाटातील बस दुर्घटना

सातारा – आंबेनळी घाटात बुधवारी रात्री अपघातग्रस्त झालेल्या अक्कलकोट- महाड एसटी बस नियमित चालकाऐवजी दुसराच चालक चालवित असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या एसटीचे नियमित चालक प्रवीण खरात यांनी मद्यप्राशन केले होते व दुसरे चालक संदीप तावरे यांनी समोरच्या वाहनाला चुकवताना हा अपघात झाल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे. त्यामुळे तावरे यांच्यावर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एसटी महामंडळाने या प्रकरणात हात वर केले आहेत. मात्र, पोलादपूर पोलिसांनी प्रकरणात तातडीने कारवाई करून तावरे याला ताब्यात घेतले. चालक बदलाच्या या प्रकारात प्रवाशांच्या जीवाशी विनाकारण खेळ झाल्याची संतापजनक बाब पुढे येत आहे. अक्कलकोट- महाड बसला बुधवारी रात्री आंबेनळी घाटात पायटा या गावाच्या हद्दीत अपघात झाला. या बसमध्ये 58 प्रवासी होते. मात्र चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने एसटी दरीच्या बाजूला तीस फूट कोसळून एका झाडाला अडकली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले.

या एसटी बसचे नियमित चालक प्रवीण खरात यांच्याऐवजी एसटीचेच अन्य चालक संदीप तावरे गाडी चालवत होते. पोलादपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, प्रवीण खरात व संदीप तावरे हे दोघेही एसटी महामंडळात चालक आहेत. तावरे याची ड्यूटी याच गाडीवर गुरूवारी सकाळपासून सुरू होणार होती.

मात्र, खरात याने मद्यप्राशन केले होते आणि तो कंटाळला होता म्हणून त्याने तावरे याला गाडीचा ताबा दिला. पायटा गावाच्या हद्दीत समोरून आलेले वाहन चुकवण्याच्या नादात एसटीची एक बाजू कठड्याला घासून ती उलटली, अशी कबुली तावरे यांने दिल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. तावरेवर गुन्हा दाखल करून खरातने ड्युटीवर असताना मद्यप्राशन केल्याचा अहवाल पोलादपूर पोलिसांनी तयार केला आहे. या अहवालाच्या आधारावर खरात याचा खुलासा घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. मात्र, महाड आगाराने याबाबत कोणतीच माहिती दिली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.