पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या मोहिमेतंर्गत ‘वाईन नको दूध प्या’ हा उपक्रम राज्यभरातील डिपार्टमेंट स्टोअर समोर राबविला जाणार आहे. 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधील हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्यशासनाकडून लोकांच्या आरोग्याचा विचार न करता शासन केवळ महसूल वाढविण्यासाठी रेशन दुकानांवर वाईन विक्रीचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या समाजविघातक धोरणाला वेळीच रोखण्यासाठी महाराष्ट्र अनिसच्या माध्यमातून चला व्यसनाला बदनाम करूया ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत असून त्याचा एक भाग म्हणून वाईन नको दूध प्या हा उपक्रम राबविला जाणार आहे.
त्यात प्रामुख्याने डिपार्टमेंट स्टोअर मालकांना आपल्या स्टोअर मध्ये वाईन विक्री न करण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली जाणार आहे. वाईन हे पेय महिलांमध्ये जास्त प्रमाणात सेवन केले जाते आणि वाईन ची विक्री डिपार्टमेंट स्टोअर वर केल्यास महिलांमधील व्यसनाधीनता वाढणार आहे. त्यामुळे समितीकडून याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
या शिवाय, या कालावधीत व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने व्यसन विरोधी निती जाहीर करावी यासाठी या साप्ताहात पाठपुरावा केला जाणार आहे. साप्ताहा दरम्यान राज्यभरात व्यसन विरोधी युवा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, यात तरुणांना व्यसनमुक्ती दुत म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे तरुण व्यसन विरोधी प्रदर्शने, जागरूकता, पोस्टर, चित्रफिती, व्यसन मुक्त फेरीचे आयोजन, व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा उपक्रम घेतले जाणार आहेत. 31 डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने चालू असतात त्याविरोधात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना ठिकठिकाणी निवेदने देण्यात येणार आहेत.