पुणे – अपयश ही यशाची पहिली पायरी असते. जागतिक कुस्ती स्पर्धेत दोन वेळा पदकाची संधी मला साधता आली नसली तरी यंदा मात्र या स्पर्धेत किमान ब्रॉंझपदक मिळविण्याचे स्वप्न मी साकार करणार आहे असे पुण्याचा कुस्तीगिर राहुल आवारे याने सांगितले. जागतिक स्पर्धा 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत कझाकिस्तानमध्ये होणार आहे.
नवी दिल्ली येथे मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत राहुलने पहिल्या लढतीत नवीनकुमारचा 9-6 असा पराभव केला. 61 किलो गटाच्या अंतिम लढतीत त्याने रविंदरकुमारला 6-2 असे सहज पराभूत केले. तिसऱ्यांदा राहुलची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भारतीय फ्रीस्टाईल संघ – 57 किलो-रवी दहिया, 61 किलो-राहुल आवारे, 65 किलो-बजरंग पुनिया, 70 किलो-करणकुमार, 74 किलो-सुशीलकुमार, 79 किलो-जितेंदर/वीरदेव गुलिया, 86 किलो-दीपक पुनिया, 92 किलो-प्रवीणकुमार, 97 किलो-मौसम खत्री, 125 किलो-सुमित मलिक
यापूर्वी त्याने 2011 व 2014 मध्ये या स्पर्धेत भाग घेतला होता. 2011 मध्ये त्याला 55 किलो गटातील दुसऱ्या फेरीतच पराभूत व्हावे लागले होते तर 2014 मध्ये त्याने 57 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. तो अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. त्याने कुस्तीचे बाळकडू गोकुळ वस्ताद तालमीत रुस्तुम-ए-हिंद कै.हरिश्चंद्र बिराजदार यांच्याकडून घेतले होते. राहुलने 2011 मध्ये राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक व 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. 2011 व 2018 मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे.
जागतिक स्पर्धेबाबत त्याने सांगितले की, जागतिक क्रमवारीत मला चौथे स्थान आहे. मला या स्पर्धेत रशिया, क्यूबा व अमेरिकन मल्लांचे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीय सराव शिबिरात माझा कसून सराव सुरू आहे. गेल्या चार वर्षांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये माझी कामगिरी अव्वल दर्जाची झाली आहे. गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही मला सोनेरी यश मिळाले होते. त्याचाही फायदा मला होणार आहे.