मंबई – करोनाची दुसरी लाट मंदावत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेचा बॉलिवूडला सुद्धा सर्वाधिक फटका बसला आहे. करोनामुळे अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. असे असताना आणखी एका अभिनेत्रीचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. आयुष्यमान खुराणाच्या ‘ड्रिम गर्ल’ या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ हिचे निधन झाले आहे.
अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्ताला चुलत बहिण चंदा सिंह निकुंभ हिने दुजोरा दिला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार २५ मे रोजी रिंकूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यानंतर ती होम आयसोलेशनमध्ये होती. पण तिचा ताप उतरत नसल्याने तिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. पहिल्या दिवशी तिला सामान्य वार्डात भरती करण्यात आले पण, दुस-याच दिवशी आयसीयूमध्ये दाखल केले गेले होते. रिंकू आधीच दम्याच्या आजाराने ग्रस्त होती. अशात तिची प्रकृती बिघडली व तिने अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्रीने ७ मे रोजी करोना लसीचा पहिला डोस सुद्धा घेतला होता. लवकरच ती दुसरा डोस घेणार होती. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. रिंकूच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
रिंकूने चिडियाघर व बालवीर सारख्या मालिकेत काम केले होते. हॅलो चार्ली या वेबसीरिजमध्येही ती झळकली होती. आयुष्यमान खुराणाच्या ‘ड्रिम गर्ल’ या सिनेमात महत्त्वपूर्ण रिंकूने महत्वाची भूमिका साकारली होती.