मुज्जफरपुर – संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओकडून बिहार मध्ये पाचशे खाटांचे कोविड विशेष हॉस्पीटल मुज्जफरपुर जिल्ह्यात उभारले जाणार आहे. त्यासाठी जागा निश्चीत करण्यासाठी डीआरडीओचे दोन जणांचे पथक आज येथे दाखल झाले.
दिल्लीत डीआरडीओने जसे कोविडसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे हॉस्पीटल उभारले आहे, तसेच हॉस्पीटल येथेही उभारले जाणार आहे. उत्तर बिहार मधील करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने तेथे ही उपाययोजना केली जाणार आहे.
जिल्ह्यांतील चार जागा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डीआरडीओच्या प्रतिनिधींना दाखवल्या. यातील एक जागा निश्चीत करून तेथे पंधरा दिवसांत हॉस्पीटल उभारले जाणार आहे. या प्रस्तावीत पाचशे खाटांच्या हॉस्पीटल मध्ये दीडशे खाटांसाठी व्हेंटिलेटर्सची सोय असेल. बिहार मधील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या आजच्या आकडेवारीनुसार 36 हजार 314 इतकी झाली आहे.