नवी दिल्ली – देशापुढे सध्या करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने मोठे संकट उभे केले आहे. विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. अशातच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ला एक मोठं यश मिळालं आहे.
यापूर्वी, करोनावर प्रभावी ठरेल असं २-डीजी हे औषध बनवणाऱ्या DRDO ने आता किट बनवलं असून याद्वारे तुमच्या शरीरामध्ये करोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज वा प्लाझ्मा आहे का? हे समजू शकणार आहे. या किटचे नामकरण DIPCOVAN असं करण्यात आलंय. सध्या या किटच्या चाचण्या १ हजार रुग्णांवर घेण्यात येणार आहेत.
DRDO च्या या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ( ICMR ) एप्रिल महिन्यात परवानगी दिली आहे. तर DIPCOVAN किटला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मी महिन्यात परवानगी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, हे किट जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाजारात उतरवण्यात येईल. याची किंमतही अत्यंत माफक असणार असून हे केवळ ७५ रुपयांमध्ये खरेदी करता येईल अशीही माहिती मिळाली आहे.
DIPCOVAN द्वारे शरीरातील स्पाईक प्रोटीनची चाचणी देखील केली जाऊ शकते. या किटची संवेदनशीलता ९७ टक्के इतकी असून ते ९९ टक्क्यांपर्यंत अचूक आहे. करोनाविरोधातील लढ्यामध्ये हे किट अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं मानलं जातंय. लसीकरणावेळीही या किटचा उपयोग करून योग्य निर्णय घेण्यास मदत होईल असंही जाणकार सांगतात.
तत्पूर्वी, DRDO ने २-डीजी हे औषध सादर करत यामुळे करोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज कमी करण्यात मदत होईल असा दावा केला होता.