दंगलविरोधी वाहनांसाठी ‘डीआरडीओ’चे प्रयत्न

संशोधक काथिका रॉय : तणावग्रस्त परिस्थितीत सुरक्षित वाहतुकीचा पर्याय

पुणे – “काश्‍मीरसारख्या सीमाभागात लष्करावर होणारी दगडफेक असो, की नागरी परिसरात होणारी दंगल अशा तणावग्रस्त परिसरात लष्कराला सुरक्षितपणे वाहतूक करता यावी, यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच “डीआरडीओ’कडून “दंगलविरोधी’वाहनांचा विकास केला जात आहे. सध्या या वाहनांची निर्मिती प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती संशोधक काथिका रॉय यांनी दिली.

मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्‍नॉलॉजी (मिलिट) येथे आयोजित “मिलिटरी रोबोटिक्‍स’ विषयावरील चर्चासत्रात रॉय बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “लष्कराच्या गरजा लक्षात घेत, त्यासाठी आवश्‍यक तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच “डीआरडीओ’कडून केले जाते. याच कार्यक्रमांतर्गत लष्करासाठी दंगलविरोधी वाहने तयार करण्याचे उद्दिष्ट “डीआरडीओ’ला देण्यात आले असून, सध्या या वाहनांवर काम सुरू आहे. या वाहनांमध्ये आवश्‍यक यंत्रण बसविण्यासाठी लष्कराकडून माहिती मागविण्यात आली असून, त्यानंतर या यंत्रणेवर प्रत्यक्ष काम केले जाईल.’

सीमाभागात अथवा तणावग्रस्त भागात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे हे महत्त्वाचे काम असते. मात्र, अशा ठिकाणी होणाऱ्या दंगली अथवा दगडफेकीमुळे या कामात बाधा निर्माण होते. “दंगलविरोधी’ वाहनांमुळे लष्कराला तणावग्रस्त परिस्थितीचा सामना करणे शक्‍य होणार असून, त्याठिकाणी सुरक्षितपणे आणि जलद हालचाल करता येईल. त्यामुळेच “डीआरडीओ’कडून ही वाहने तयार करण्यासाठी जास्तीत जास्त भर दिला जात असल्याचेही रॉय यांनी सांगितले.

भारतात “सेन्सर’ यंत्रणेवर काम नाही
“डीआरडीओ’कडून विविध क्षेपणास्त्रे, वाहने, मशीन्स बनविल्या जातात. मात्र, यामध्ये अवश्‍यक असणारी “सेन्सर’ यंत्रणा भारतात उपलब्ध नाही. भारतीय कंपन्यांकडून संपूर्णत: भारतीय बनावटीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. विशेषत: “सेन्सर’निर्मिती बाबत हा अनुभव जास्त आहे. आपल्याकडे भारतीय बनावटीच्या सेन्सरची निर्मितीच होत नाही. त्यामुळे रासायनिक, आण्विक पदार्थांबाबत लवकर संकेत मिळत नाहीत. परिणामी, अशा गोष्टींमुळे नुकसान तर होतेच शिवाय सेन्सर यंत्रणा बाहेरून आयात केल्यामुळे जास्त पैसेदेखील खर्च होतात. त्यामुळेच कंपन्यांनी भारतीय बनावटीची सेन्सर यंत्रणा विकसित करावी, असे आवाहन “डीआरडीओ’कडून खाजगी कंपन्यांना केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.