पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, या दोन्ही चित्रकला परीक्षा २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत.
सन २०२४-२५ पासून महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचा अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता शासकीय रेखाकला परीक्षा मंडळाकडून परीक्षा घेण्यात येणार आहेत. शासनाने शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुनर्रचित अभ्यासक्रमास १६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या निर्णयानुसार मान्यता दिली आहे. त्यानुसार यंदा ही शासकीय रेखाकला परीक्षा घेण्यात येणार आहे.
संबंधित सर्व केंद्रप्रमुखांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नावनोंदणी करताना दोन्हीपैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी करावी. केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर भरावे,
याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन संचालक विनोद दांडगे यांनी केले आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार आहे.
२५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १ वेळेत वस्तुचित्र, दुपारी २ ते ४ या वेळेत स्मरणचित्र, २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १ पर्यंत संकल्पचित्र नक्षीकाम, दुपारी २ ते ४ या वेळेत कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन या विषयाची एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा होणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते १:३० या वेळेत स्थिरचित्र, तर दुपारी २:३० ते ४:३० स्मरणचित्र आणि २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० संकल्पचित्र नक्षीकाम, दुपारी २:३० ते ५:३० कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन या विषयासाठी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा होणार आहेत.