द्रविडचा सल्ला लाभदायक ठरला – विहारी

नवी दिल्ली – भारतीय संघाचा मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज हनुमा विहारीने माजी कर्णधार राहुल द्रविडला सलाम केला आहे. द्रविडने वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मला मोठा लाभ झाला, असेही त्याने सांगितले. 

बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतीनंतर एखाद्या योद्‌ध्याप्रमाणे खेळपट्टीवर ठाण मांडून फलंदाजी करणाऱ्या हनुमा विहारीला द्रविडने एक खास मेसेज केला होता. तिसऱ्या कसोटीमधील पराभव टाळण्यासाठी मैदानावर तग धरत विहारी व रवीचंद्रन अश्‍विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढले आणि मालिका तिसऱ्या कसोटीनंतर 1-1 अशी बरोबरीत राहिली. मालिका विजयामध्ये नंतर हा अनिर्णित राहिलेला सामनाही फार महत्वाचा ठरला.

तिसऱ्या कसोटीमध्ये भारताला पराभव टाळण्यासाठी पाचवा दिवस खेळून काढायचा होता. चेतेश्‍वर पुजाराची सोबत करण्यासाठी हनुमा विहारी मैदानात आला तेव्हा भारताला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी 50 हून अधिक षटके खेळून काढायची होती. रविंद्र जाडेजाला दुखापत झाल्याने पुजारा व विहारी यांनी सावध खेळी केली. मात्र 50 धावा पूर्ण झाल्यानंतर 89 षटकात पुजारा बाद झाला आणि भारताला आणखीन एक झटका बसला. 40 षटके बाकी असताना अश्‍विन फलंदाजीसाठी आला. मात्र, दोघांनीही ही 40 षटके खेळून काढत सामना वाचवला. विहारीने तर पायाचे स्नायू दुखावल्यानंतरही खेळपट्टीवर टीच्चून उभे राहताना 161 चेंडूंमध्ये त्याने नाबाद 23 धावा करत भारतीय संघाचे मालिकेती आव्हान कायम ठेवले. त्यामुळेच भारताने सिडनीच्या मैदानातील ही कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

सिडनी कसोटीपूर्वी व नंतरही द्रविडने आपल्याला मेसेज केल्याची माहिती दिली. राहुलने विहारीचे कौतुक करणारा मेसेज केला होता. या मुलाखतीमध्ये हनुमा विहारीने राहुल द्रविडचे सध्याच्या संघातील खेळाडू घडवण्यामधील योगदानही मोलाचे असल्याचे सांगितले. द्रविडने अनेक खेळाडूंना रणजी चषक आणि भारतीय संघातील स्थान यामधील अंतर कमी करण्यासाठी मदत केल्याचे विहारी म्हणाला. द्रविडने भारतीय अ संघाच्या प्रशिक्षक पदाची भूमिका बजावताना भारतीय संघासाठी सेकंड बेंच तयार केला यात शंका नाही, असेही त्याने म्हटले आहे.

आज संघात खेळणारे महंमद सिराज, शुभमन गिल, मयंक आग्रवाल हे भारत अ संघासाठी खेळले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षात आम्ही भारत अ संघाकडून खेळताना अनेक दौरे केले. त्यावेळी द्रविडच प्रशिक्षक होते. यापूर्वी अ संघाने एवढे दौरे केल्याचे मला आठवत नाही. त्यामुळेच रणजी चषक आणि भारतीय संघातील अंतर कमी होण्यास मदत झाली. आम्ही खूप वेगाने प्रगती करत संघात जागा मिळवली. यामुळेच आज आम्हाला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आणि आम्ही इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी नाही. द्रविड यांच्यामुळेच हे शक्‍य झाले, असे विहारीने सांगितले.

सध्या द्रविड बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष आहे. एक तरुण खेळाडू म्हणून आम्ही त्यांना आमच्या खेळासाठी खूप धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला आमचा नैसर्गिक खेळ करु दिला. जेव्हा आम्ही त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळतो तेव्हा ते प्रशिक्षकापेक्षा सल्लागार जास्त वाटतात. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यादरम्यानही मी त्यांना फोन केला होता. तेव्हा त्यांनी, तू रणजी तसेच भारत अ संघासाठी खेळताना खूप मोलाची कामगिरी केली आहेस. आता तू पदार्पणासाठी सज्ज आहेस. त्यामुळे अत्यंत जबाबदारीने खेळ, असेही द्रविड यांनी सांगितल्याचे विहारी म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.